वेलिंग्टन : सुरुवातीला पडझड झाल्यानंतरही कॅमेरून ग्रीनच्या शतकी (नाबाद १०३ धावा) खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध ९ बाद २७९ अशी वाटचाल केली. ग्रीनसोबत दुसऱ्या बाजूला जोश हेजलवूड उभा होता. त्याने अद्याप खाते उघडलेले नाही. थंड आणि ढगाळ वातावरणात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकताच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आदल्या दिवशी रात्री पाऊस पडल्यामुळे खेळपट्टी नरम होती. सकाळी मात्र ऊन पडले होते. त्यातही न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कमाल केली.
उपाहाराच्या दहा मिनिटे आधी स्टीव्ह स्मिथ (३१) बाद झाला. उपाहारानंतर मात्र मार्नस लाबुशेन (१), उस्मान ख्वाजा (३३) आणि ट्रॅव्हिस हेड (१) माघारी परतले. यामुळे ४ बाद ८९ अशी अवस्था झाली होती. मिशेल मार्श (४०) आणि ग्रीन यांनी पाचव्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. मार्श ३९ चेंडूत सहा चौकार आणि एका षट्कारासह ४० धावा काढून मॅट हेन्रीच्या चेंडूवर बाद झाला.
ग्रीनने मात्र एक टोक सांभाळून न्यूझीलंडच्या आशेवर पाणी फेरले. त्याने १५४ चेंडूंत दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर १६ चौकारांसह स्वत:चे दुसरे कसोटी शतक पूर्ण केले. हेन्रीने ४३ धावांत ४ तर विलियम ओरोरके आणि स्कॉट कुगेलेजिन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रचिन रवींद्रने ४ षटकांत १९ धावा दिल्या आणि एक गडी बाद केला.
Web Title: Cameron Greene's unbeaten century; Australia recovered
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.