मुंबई - भारताने रविवारी ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सात गडी राखून जिंकला. या विजयासोबतच भारतीय क्रिकेट संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. पाच एकदिवसीय सामन्यांची ही मालिका भारताने 4-1 ने जिंकली. संपुर्ण मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचं वर्चस्व दिसत होतं. यावेळी सर्वात महत्वाची कामगिरी बजावली ती भारतीय गोलंदाजांनी. भारतीय स्पिनर्ससमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भांबेरी उडालेली दिसली. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना आपला करिश्मा दाखवत फलंदाजांवर अंकुश ठेवला. 22 वर्षीय कुलदीप यादवने मालिकेतील चार सामन्यांमध्ये एकूण सात विकेट्स घेतले. यामध्ये एका हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.
सामना संपल्यानंतर कुलदीप यादवने सांगितलं की, 'माझ्यासाठी ही एक कठीण मालिका होती. पहिल्या सामन्याआधी मी चांगली तयारी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांविरोधात गोलंदाजी करणं सोपी गोष्ट नव्हती. कसोटीत पदार्पण केल्यानंतर माझ्यासाठी गोष्टी बदलल्या आहेत. मला अनेक संधी मिळाल्या आहेत. विजेत्या संघाचा भाग असणं चांगली गोष्ट आहे'.
एकेकाळी फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वॉर्न यानेदेखील कुलदीप यादवची स्तुती केली आहे. शेन वॉर्न याने ट्विटरच्या माध्यमातून कुलदीप यादववर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 'गेल्यावेळी जेव्हा मी भारतात होतो, तेव्हा मी कुलदीप यादवला भेटलो होते. ज्याप्रकारे कुलदीप यादव गोलंदाजी करत फलंदाजांना गोंधळवून टाकतो, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही.. ते कमाल आहे'.
यानंतर केलेल्या ट्विटमध्ये शेन वॉर्नने एकाप्रकारे भविष्यवाणी केली आहे, जी वाचून कुलदीप यादव नक्कीच आनंदी होईल. शेन वॉर्नने लिहिल आहे की, 'जर कुलदीप यादवने सर्व फॉरमॅटमध्ये संयम ठेवत गोलंदाजी केली, तर तो जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरच्या जागेवरुन यासिरला हटवू शकतो'.
कुलदीप यादवने 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 18 विकेट्स घेतले आहेत. तर दोन कसोटी सामन्यांमध्ये नऊ विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादव दोन टी-20 सामने खेळला असून, क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये मात्र तो एकही विकेट घेऊ शकला नाही. मात्र ज्याप्रकारे कुलदीप यादवने ऑस्ट्रेलिया फलंदाजांची दांडी उडवली आहे, ते पाहता आगामी टी-20 सामन्यांमध्ये तो चांगलं प्रदर्शन करेल अशी अपेक्षा आहे.