लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘विराट कोहलीचा खराब फॉर्म भारतीय क्रिकेट विश्वात सर्वात चर्चित मुद्दा ठरला आहे. ऑफ स्टम्पबाहेर जाणारे चेंडू खेळताना त्याच्या उणिवा चव्हाट्यावर आल्या. ही समस्या सोडविण्यासाठी विराटने मला फक्त २० मिनिटे द्यावी. मी ही समस्या दूर करून त्याचा फॉर्म परत मिळवून देऊ शकतो,’ अशी तयारी माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी दाखविली आहे.
कधी काळी धावांचा पाऊस पाडणारा विराट सध्या एक-एक धाव घेण्यासाठी झगडताना दिसतो. त्यामुळे त्याच्यावर काही माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली.
भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा पराभव केल्यानंतर एका वाहिनीशी संवाद साधताना गावसकर म्हणाले, ‘विराटचे काय चुकत आहे, हे सांगण्यासाठी फक्त २० मिनिटे त्याच्यासोबत घालवण्याची गरज आहे. मला जर त्याच्यासोबत २० मिनिटे थांबण्याची संधी मिळाली तर मी त्याला नक्कीच मदत करू शकतो.’
काही दिवसांआधी विराटच्या अडचणी सांगताना गावसकर म्हणाले होते की, ‘ऑफ-स्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू हाताळणे ही त्याची महत्त्वाची समस्या आहे. त्यात भर म्हणजे, फॉर्ममध्ये परत येण्याच्या चिंतेने त्याच्याकडून होणाऱ्या चुकांमध्ये आणखी वाढ होत आहे.’