कोलकाता : थुंकीच्या वापरावर बंदी घालण्यात आली तरी चेंडूची चमक जर कायम राखली तर रिव्हर्स स्विंग करू शकतो, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने व्यक्त केले.
कोरोना व्हायरस महामारीमुळे ठप्प असलेला खेळ पुन्हा सुरू होईल त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी ) चेंडूची चकाकी कायम राखण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घालण्याची तयारी करीत आहे. कारण त्यांच्या मते चेंडूवर थुंकीचा वापर केला तर कोविड-१९ च्या संक्रमणाचा धोका आहे. शमीने रोहित जुगलानसोबत इन्स्टाग्राम चॅटदरम्यान म्हटले की,‘कठीण होईल. लहानपणापासून थुंकीच्या वापराची सवय झाली आहे. जर तुम्ही वेगवान गोलंदाज असाल तर स्वत:च चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर करण्यास सुरुवात करता, पण तुम्ही जर कोरड्या चेंडूची चकाकी कायम राखण्यात यशस्वी ठरले तर निश्चितच चेंडू रिव्हर्स स्विंग होईल.’
रिव्हर्स स्विंग करण्यात माहिर असलेला शमी म्हणाला,‘घाम व थुंकी वेगवेगळ्या प्रकारे काम करते. मी कधीच थुंकीविना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही. आता कोरोना व्हायरस महामारीमुळे थुंकीचा वापर रोखणे महत्त्वाचे आहे.’ (वृत्तसंस्था)