टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर शतक झळकावले आणि आपल्या जुन्या शैलीत बॅटने फ्लाइंग किस केले. मात्र त्याचा हा फ्लाइंग किस 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तुलनेत, फारच वेगळा होता. तेव्हा विराट प्रचंड अॅग्रेशनने आपले शतक सेलिब्रेट करत होता. पण आता त्याच्या शतकाचे सेलिब्रेशन बरेच वेगळे झाले आहे.
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी, विराटच्या या फ्लाइंग किस सेलिब्रेशन संदर्भात बोलताना, 2015 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक किस्सा सांगितला. ज्यात विराटने अनुष्काला सोबत नेण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली होती. मात्र, याचवेली त्यांनी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) केवळ पत्नीलाच सोबत नेण्याची परवानगी देते, असेही सांगितले.
पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी रवी शास्त्री हा किस्सा सांगताना म्हणाले, "मला आठवते की मी 2015 मध्ये प्रशिक्षक होतो, तेव्हा विराट कोहलीचे लग्न झालेले नव्हते. तेव्हा तो अनुष्काला डेट करत होता. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की, सोबत फक्त पत्नींनाच परवानगी आहे, मी माझ्या गर्लफ्रेंडला सोबत आणू शकतो? मी म्हणालो, हो का नाही. तेव्हा तो म्हणाला, बोर्ड परवानगी देत नाहीय. मग मी निर्णय घेतला आणि ती (अनुष्का) विराटसोबत आली आणि पहिल्याच सामन्यात, जी बॉक्सिंग डे कसोटी होती, विराटने 169 धावा केल्या आणि तेव्हा असेच काही घडले होते. त्याने बॅटने फ्लाइंग किस केले. तर अनुष्का जी आहे, ती विराटसाठी चांगला सपोर्ट ठरली होती."
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2014-15 च्या टेस्ट सिरीज मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. ही बॉक्सिंग डे कसोटी होती आणि येथे विराट कोहलीने 169 धावांची जबरदस्त खेळी खेळली आणि त्यानंतर बॅटने फ्लाइंग किसही दिला होता.