नवी दिल्ली : ‘टी-२० क्रिकेटमधील माझी कामगिरी चांगली आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये मी समाधानकारक कामगिरी करू शकलो नाही. मी एकदिवसीय संघाबाहेर असून त्याची कारणे समजू शकतो, पण टी-२० संघात माझ्या पुनरागमनाची चांगली शक्यता आहे,’ असा विश्वास भारताचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याने व्यक्त केला आहे.
कार्तिकने आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत २६ कसोटी सामने, ९४ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सध्या एकदिवसीय संघाबाहेर असलेल्या कार्तिकने टी-२० संघात मात्र पुनरागमनाविषयी विश्वास व्यक्त केला आहे. कार्तिकने म्हटले की, ‘मी नुकतीच काही देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मी पुनरागमन करू शकत नाही, असा विचार करण्याचे माझ्याकडे कोणतेही कारण नाही. माझ्या मनात नेहमीच देशाकडून खेळण्याचा निर्धार कायम राहिला आहे.’
विश्वचषक स्पर्धेत कार्तिकला विश्वचषक स्पर्धेत दोन डाव खेळण्याची संधी मिळाली. मात्र यामध्ये तो अपयशी ठरला. यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीचाही समावेश आहे, ज्यात तीन यष्टिरक्षक खेळाडू (कार्तिक, धोनी, पंत) अंतिम संघातून खेळले होते. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाची धुरा वाहिल्यानंतरही आता कार्तिक या संघातून बाहेर आहे. मात्र यामुळे आपण दु:खी नसल्याचेही कार्तिकने म्हटले. याविषयी कार्तिकने सांगितले की, ‘मी याआधीही अशा परिस्थितीतून गेलो आहे. माझी कारकीर्द उतार-चढावाने भरलेली आहे. यातून मी खूप गोष्टी शिकलो. संघातून बाहेर बसणे माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. त्यामुळे अशा परिस्थितीचाही मी खूप सहजपणे सामना करतो.’ टी-२० विश्वचषकाविषयी कार्तिक म्हणाला की, ‘टी-२० विश्वचषक स्पर्धा आता खूप दूर नाही आणि मला कल्पना आहे की, जर मी चांगली कामगिरी करू शकलो, तर संघात नक्कीच कायम स्थान मिळवेन. हे आव्हान नक्कीच कठीण आहे. संघ खूप मजबूत आहे, पण एक खेळाडू म्हणून मला चांगली कामगिरी करावीच लागेल.’
सध्या लॉकडाऊनमुळे आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. याबाबत कार्तिकने म्हटले की, ‘सध्या जी परिस्थिती सुरू आहे, त्यात मी आयपीएलचा अधिक विचार करीत नाहीये. लॉकडाऊनच्या आधी मात्र मी आयपीएलसाठी कठोर मेहनत केली होती. प्रत्येक स्पर्धेआधी ज्या प्रकारे तयारी करतो, तशीच तयारी आयपीएलसाठी केली होती. (वृत्तसंस्था)
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी कार्तिकची सर्वोत्तम सरासरी टी-२० मध्ये असून त्याने ३३.२५ च्या सरासरीने आणि १४३.५२च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेआधी झालेल्या आॅस्टेÑलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कार्तिकला भारतीय संघाबाहेर करण्यात आले होते. मात्र उत्कृष्ट यष्टिरक्षण कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर त्याला विश्वचषक स्पर्धेत रिषभ पंतऐवजी प्राथमिकता देण्यात आली होती. मात्र धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंतची भारतीय संघात निवड झाली होती.
Web Title: Can still play a decisive role in T-20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.