पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानं भारतीय खेळाडूंवर टीका करण्याचं सत्र सुरूच ठेवलं आहे. यावेळी त्यानं भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांना लक्ष्य केले. गंभीर आणि सेहवाग हे चांगले व्यक्ती आहेत, परंतु टीव्हीसमोर आल्यावर ते काहीही बरळतात, असं विधान अख्तरनं केलं. यावेळी अख्तरनं हेही म्हटलं की या दोघांबद्दल मीही अपमानजनक बोलू शकतो, शिवीगाळ करू शकतो, परंतु तसं मी करत नाही.
सोमवारी अख्तरनं भारताचा माजी सलामीवीर वीरूला खोटारडा म्हटलं होतं. पाकिस्तान दौऱ्यावर वीरूनं तिहेरी शतक झळकावलं होतं. त्यावेळचा 'बाप बाप होता है!' हा किस्सा वीरूनं अनेकदा सांगितला. त्यावरून अख्तरनं भारतीय फलंदाजाला खोटारडा ठरवलं. उलट वीरू जेव्हा प्रत्यक्ष भेटला तेव्हा असं काही न म्हटल्याचं त्यानं सांगितलं. यावरूनच टीव्हीसमोर आल्यावर तो काहीही बोलतो हे स्पष्ट होतं, असं अख्तर म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''सेहवाग आणि गंभीर ही चांगली माणसं आहेत. पण, जेव्हा ते टीव्हीसमोर येतात तेव्हा जे तोंडात येईल ते बरळतात. मीही त्यांच्याप्रती अपमानजनक वक्तव्य करू शकतो आणि शिवीगाळही करू शकतो, परंतु मी असं करत नाही. कारण, लहान मुलंही कार्यक्रम पाहतात.''
अख्तरनं 46 कसोटी आणि 163 वन डे साममन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 178 आणि वन डेत 247 विकेट्स घेतल्या होत्या. 2011मध्ये निवृत्ती घेणाऱ्या अख्तरनं 15 ट्वेंटी-20 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या आहेत.