मुंबई : कॅनडाचा रवींदरपाल सिंग आणि नामिबियाचा जेपी कोत्झे यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा यांनाही असा विक्रम नोंदवता आलेला नाही. पण, रवींदरपाल आणि जेपी यांनी ट्वेंटी-20 क्रिकेटच्या पदार्पणात शतक झळकावण्याचा विश्वविक्रम केला. याआधी ट्वेंटी-20च्या पदार्पणात सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर होता. पाँटिंगचा 14 वर्षांपूर्वीचा हा विक्रम कॅनडा व नामिबियाच्या फलंदाजांनी मोडला.
आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप क्वालिफायर क्रिकेट स्पर्धेत या विक्रमाची नोंद झाली. कॅनडा विरुद्ध कायमन आयलंड आणि नामिबिया विरुद्ध बोत्सवाना असा सामना झाला. त्यात कॅनडा व नामिबिया यांनी बाजी मारली. रवींदरपालने 48 चेंडूंत 101 धावांची खेळी केली. त्यात 10 षटकार व 6 चौकारांचा समावेश होता. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक झळकावण्याचा पहिला मान रवींदरपालने पटकावला.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये कॅनडाकडून शतक झळकावणारा रवींदरपाल हा पहिलाच फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम रवींदू गुनसेकराच्या नावावर होता. कॅनडाच्या या खेळाडूनं 2012साली संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध 95 धावांची खेळी केली होती. 2014नंतर कॅनडा प्रथमच ट्वेंटी-20 क्रिकेट खेळले. सहा वर्षांत आतंरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा असलेला एकही सामना कॅनडा खेळले नव्हते. कॅनडाने 6 बाद 196 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात कायमन आयलंडला 20 षटकांत 7 बाद 112 धावा करता आल्या.
त्यानंतर जेपीनं बुधवारच्या सामन्यात शतकं झळकावून या विश्वविक्रमात एन्ट्री मारली. नामिबियाच्या जेपीने 43 चेंडूंत 9 षटकार व 7 चौकारांसह नाबाद 101 धाव केल्या. नामिबियाने जेपीच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर 3 बाद 240 धावा चोपल्या. एन डॅव्हीन ( 54) आणि कर्णधार इजी इरास्मूस ( 56) यांनीही अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावांत हातभार लावला. प्रत्युत्तरात बोत्स्वाना संघाने 2 बाद 116 धावाच केल्या.