बांगलादेश क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे. एका बाजुला भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटीची उत्सुकता शिगेला पोहचली असताना दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर या द्विपक्षीय मालिकेबद्दल असंतोषाची लाट उसळल्याचे चित्र दिसून येत आहे. Cancel_Bangladesh_Series या हॅशटॅगच्या माध्यमातून या कसोटी मालिकेला विरोध करण्यात येत आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकाही खेळणार आहे. १९ सप्टेंबरला चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
भारत-बांगलादेश यांच्यातील मालिकेला विरोध का?
बांगलादेशातील हिंसाचार आणि तणावामुळे उजव्या विचारसरणीच्या हिंदू महासभेकडून बांगलादेश विरुद्धच्या मालिकेला विरोध दर्शवण्यात आला आहे. शेजारील राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदूवर झालेल्या अत्याचाराचा दाखला देऊन भारतातील हिंदू संघटनेनं भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिका रद्द करण्याची मागणी केली आहे.
कानपूर कसोटी अधिक आव्हानात्मक
चेन्नईत रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापेक्षा कानपूरमध्ये नियोजित दुसऱ्या कसोटी सामना खेळवणं आव्हानात्मक झालं आहे. कारण २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये होणाऱ्या सामन्यात व्यत्यय आणण्याची धमकीही संबंधित संघटनेने दिली आहे. त्यामुळे सामना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा होती. पण सामना नियोजित ठिकाणीच होणार असल्याची पुष्टी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
कानपूर कसोटीसाठी व्यवस्थापनाने कसलीये कंबर
बीसीसीआय संपूर्ण घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. कानपूरच्या ग्रीन पार्कवर होणाऱ्या सामन्याची जबाबदारी ही कानपूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय कपूर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ABP गंगा या हिंदी न्यूज चॅनेलला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी कानपूर कसोटीसाठी कशी तयारी करण्यात आलीये ते सांगितले आहे. ते म्हणाले आहेत की, कानपूरमधील नियोजित सामना कोणत्याही व्यत्यया शिवाय अगदी सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वोत्तम तयारी करत आहोत. स्टेडियममध्ये एक पोलिस कंट्रोल रूम तयार करण्यात येणार आहे. खेळाडूंना सुरक्षा कवच पुरवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि दूर्बिनसह पोलिसांचे विशेष पथकही साध्या वेषात स्टेडियमवर उपस्थितीत असेल.