लंडन : तयारीसाठी पुरेसा वेळ नसेल तर आॅस्ट्रेलियात आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक रद्द करण्याची सूचना इंग्लंडचा फलंदाज जेसन राय याने केली आहे. राय स्वत: मैदानावर परतण्यास मात्र इच्छुक आहे.
कोरोनामुळे जगभरात क्रिकेटसह सर्वच खेळ ठप्प आहेत. आॅस्ट्रेलियात होणाºया टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत शंका उत्पन्न केली जात आहे. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना राय म्हणाला, ‘खेळाडू तयारी करू शकणार नसतील, आणि आॅस्ट्रेलियात जाण्याची अडचण असेल तर विश्वचषक रद्द करण्यास हरकत नाही. दुसरीकडे विश्वचषकाचे आयोजन होणार असेल तर त्यात खेळणे आमचे काम आहे. खेळायचे आहे असे आम्हाला सांगण्यात आले तर तीन आठवडे जरी असतील तरी घरच्या घरी सराव करून विश्वचषकात खेळू.’
ईसीबीनेदेखील सर्व प्रकारचे क्रिकेट एक जुलैपर्यंत स्थगित केले आहे. राय खेळण्यासाठी आतुर असला तरी आरोग्य आणि सुरक्षा सर्वतोपरी असल्याचे मत त्याने व्यक्त केले. तो पुढे म्हणाला, ‘मला ईसीबीवर पूर्ण विश्वास आहे. सर्व पैलूंवर विचार केल्यानंतरच बोर्ड निर्णय घेईल. ईयोन मोर्गनसोबतही चर्चा करणार आहे. त्याला यासंदर्भात काय वाटते हे जाणून घ्यावे लागेल. ’ प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्यास मला हरकत नाही, असे राय याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ‘मी केवळ क्रिकेट खेळू इच्छितो. पुन्हा मैदानावर परतणे हा आगळावेगळा अनुभव असेल. लहान मुलाला खेळण्यासाठी बाहेर जाण्याची जशी आवड आणि धडपड असते, तसेच माझेही झाले आहे.’
Web Title: Cancel T20 World Cup if you don't have time to prepare - Jason Roy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.