नवी दिल्ली : ‘आपण नेहमी प्रशासकपदी कायम राहू शकत नाही. आता दुसरे काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मी यापेक्षा वेगळे काहीतरी करेन,’ असे सूचक उद्गार बीसीसीआय अध्यक्षपदावरून पायउतार होणार असलेले माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गुरुवारी काढले. अध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर गांगुलींनी पहिल्यांदा भाष्य केले.
अध्यक्षपद सोडण्यासाठी अनेक घडामोडी घडल्या. यावर त्यांनी मौन सोडले आणि मला स्वतःवर विश्वास असल्याचे सांगितले. एका खासगी कार्यक्रमात ५० वर्षीय गांगुली म्हणाले, हे जीवनचक्र आहे. त्यात चढ-उतार येत राहतात. या काळात स्वत:वर विश्वास ठेवणे सर्वांत महत्त्वाचे असते. लॉर्डसवर पदार्पणाच्या वेळी माझी मानसिकता सर्वोत्तम होती. मी तिथे माझी खेळी दाखवली. आपल्याला मोठे काहीतरी करण्यासाठी आपण प्रत्येकजण छोटी पावले उचलतो. हे प्रयत्न दिवसेंदिवस करत राहावे लागतील. सर्वकाही पटकन मिळवायचे असेल तर ते शक्य नाही. तुम्ही एका दिवसात सचिन तेंडुलकर किंवा नरेंद्र मोदी बनू शकत नाही.’
सौरव गांगुली २०१९ पासून बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आहेत. तेव्हापासून सचिव जय शहा हेही या पदावर आहेत. दोघांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. मात्र, जय शहा आपल्या पदावर कायम राहतील, तर गांगुलींना पदावरून पायउतार व्हावे लागेल.
मी प्रशासक राहिलो आहे. यापुढे वेगळे काहीतरी करेन. आयुष्य म्हणजे फक्त तुमचा स्वतःवर विश्वास हवा, प्रत्येकजण परीक्षा देतो, यात अपयशीही ठरतो; पण उरतो तो स्वतःवरचा विश्वास.- साैरव गांगुली