IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या दुसऱ्या सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात RCBने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराट कोहलीने ४९ चेंडूंत नाबाद ८२ धावा, तर फॅफ ड्यू प्लेसिसने ४३ चेंडूंत ७३ धावा केल्या होत्या आणि १७३ धावांची भागीदारी केली होती. पण, कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत हे दोघंही ढेपाळले अने त्यांना ८१ धावांनी हार पत्करावी लागली.
घरी आजारी वडील, आईने क्रिकेट न खेळण्यास बजावले; पण, सुयश शर्माने 'पठाण'समोर जग जिंकले!
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताचा निम्मा संघ ८९ धावांत तंबूत परतला होता, परंतु शार्दूल ठाकूर व रिंकू सिंग यांनी तुफान फटकेबाजी केली. या दोघांनी ७.४ षटकांत १०३ धावांची भागीदारी करताना KKRला ७ बाद २०४ धावांपर्यंत पोहोचवले. १००च्या आत पाच विकेट्स गेल्यानंतर KKR ने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात कोहली व ड्यू प्लेसिस यांनी उमेश यादव व टीम साऊदी यांच्याविरुद्ध चांगली खेळी केली, परंतु KKRच्या कर्णधार नीतिश राणाने फिरकीपटूला गोलंदाजीला आणले. सुनील नरीन व वरुण चक्रवर्थी यांनी अनुक्रमे कोहली व प्लेसिस यांना बाद केले.
कोहली व प्लेसिस माघारी परतल्यानंतर नरीन, चक्रवर्थी व पदार्पणवीर सुयश शर्मा यांनी RCBचा डाव १२३ धावांवर गुंडाळला. ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ब्रेसवेल व दिनेश कार्तिक हे झटपट माघारी परतले. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने RCBच्या अन्य फलंदाजांना झापले. तुम्ही फक्त विराट व प्लेसिस यांच्यावरच अवलंबून राहू शकत नाही, असे तो स्पष्ट म्हणाला. ''तुम्ही केवळ दोन खेळाडूंवर अवलंबून राहू शकत नाही. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस चांगले खेळले, तरच RCB जिंकते, हे असं समीकरण झालंय. हे नको व्हायला. ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक यांच्यासह इतरांनीही योगदान द्यायला हवं. अनुज रावत जो इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेला, त्यानेही चांगलं खेळायला हवं. RCB ने या विषयावर खेळाडूंशी व अन्य फलंदाजांशी चर्चा करायला हवी,'' असे वीरू म्हणाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"