टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवनने काल रात्री केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. माजी क्रिकेटपटूला आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रासले असल्याची भीती व्यक्त होत आहे. शिखर धवनने गुरुवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, झोप लागत नाही, मदत करा. या पोस्टनंतर गब्बरने काहीच पोस्ट न केल्याने चाहत्यांची चिंता वाढली. पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांच्या लक्षात आले की त्यांचा गब्बर अडचणीत आहे. काही चाहत्यांनी धवनला धीर देण्याचा प्रयत्न केला. ही कठीण वेळ आहे आणि ती निघून जाईल, असे अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून म्हटले.
नुकतीच पार पडलेली लीजेंड्स लीग क्रिकेटची स्पर्धा वगळली तर शिखर धवन शेवटचा IPL २०२४ मध्ये मैदानावर दिसला होता. या हंगामात त्याने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले. याच वर्षी गब्बरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
अलीकडेच गब्बरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. शिखर धवनने आपला पहिला कसोटी सामना १४ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. मोहालीच्या मैदानात डावाची सुरुवात करताना त्याने ८५ चेंडूत शतक झळकावून सर्वांनाच प्रभावित केले. पदार्पणाच्या सामन्यातील या झंझावाती खेळीसह पदार्पणाच्या कसोटीत जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम धवनने आपल्या नावे केला. हा एक विश्विक्रम आजही कायम आहे. मोहाली कसोटीत त्याने १७४ चेंडूत १८७ धावांची खेळी केली होती.