T20 World Cup - ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टिम पेन ( Tim Paine ) याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि त्याने स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत इशाराही दिला. १ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ हा जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. पण, या स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी कशी होते, त्यावर भारताचा जेतेपदाचा प्रवास अवलंबून असल्याचे पेन म्हणाला. पेनने 'अराउंड द विकेट' पॉडकास्टवर आरोन फिंच आणि मायकेल क्लार्क यांच्याशी संवाद साधताना कोहलीची तुलना ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलशी केली. विराट चांगली कामगिरी करू शकला नाही, तर रोहित अँड कंपनी वर्ल्ड कप जिंकू शकत नाही, असेही त्याने म्हटले.
"विराट कोहलीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर सर्वकाही अवलंबून आहे. त्याची कामगिरी चांगली झाली नाही, तर मला वाटत नाही की भारत वर्ल्ड कप जिंकेल. हे ग्लेन मॅक्सवेलप्रमाणेच आहे. मॅक्सवेलच्या खेळावर ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयाचा डोलारा अवलंबून आहे,''असे पेन म्हणाला.
तो पुढे म्हणाला, "मला वाटतं, एक खेळाडू म्हणून प्रत्येकाच्या कारकीर्दिची शेवटची तारीख असते. अरे, मी त्या विशिष्ट दिवशी हे केले असेल तर, असा विचार करून मला माझे करिअर संपवायचे नाही. मी खेळाडू म्हणून कायमस्वरूपी राहू शकत नाही, त्यामुळे मला कोणतीही उणीव मागे ठेवायची नाही आणि नंतर पश्चात्ताप होणार नाही, याची मला खात्री आहे," असे RCB च्या रॉयल गाला डिनरमध्ये कोहली म्हणाला.
भारतीय संघ सुरुवातीला आयपीएल लीग स्टेजच्या समाप्तीनंतर लगेचच २१ मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होणार होता. पण, आता संघ २५ व २६ मे रोजी दोन बॅचमध्ये रवाना होणार आहे. न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने ५ जून (वि. आयर्लंड), ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) रोजी होणार आहेत. कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद