नवी दिल्ली । भारताविरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान प्रेक्षकांसोबत वर्णद्वेषाचा आरोप होत असताना आता इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने याबाबत एक भावनिक पोस्ट केली आहे. खेळात वर्णद्वेषाला स्थान नसते हेच तर क्रिकेट शिकवते असे स्टोक्स म्हणाला. या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय समर्थकांनी वांशिक अत्याचाराच्या घटनांचा गंभीर आरोप केला होता. इंग्लंडने पाचवा कसोटी सामना जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
भावनिक पोस्ट करत व्यक्त केली नाराजी
दरम्यान, कर्णधार स्टोक्सने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत म्हटले, "खेळपट्टीवर चांगला आठवडा राहिला पण एजबेस्टन येथे वर्णद्वेषी अशा काही बातम्या ऐकून खरोखरच निराश झालो आहे. खेळात याला कुठेच स्थान नाही, आशा आहे सर्व चाहत्यांना कसोटी मालिकेत चांगला अनुभव मिळेल आणि वातावरण एखाद्या पार्टीसारखे राहिल. क्रिकेट हेच आहे."
लक्षणीय बाब म्हणजे अशा वादग्रस्त घटनांना आळा घालण्यासाठी वॉरविकशायरने एजबेस्टन स्टेडियमवर आगामी दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान 'फुटबॉल क्राऊड-स्टाईल स्पॉटर्स' तैनात करण्याचा निर्णय घेतला. अशाने अधिकारीवर्ग अशा घटनांची तत्काळ माहिती देतील.
पहिल्या टी-२० मध्ये भारताचा मोठा विजय
हार्दिक पांड्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडला चितपट केले. ५० धावांनी मोठा विजय मिळवून संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडवरी धावांच्या बाबतीत हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारताने दिलेल्या १९९ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ १४८ धावांवर तंबूत परतला. ५१ धावांची अर्धशतकीय खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याने ४ बळी घेत नव्या विक्रमाला गवसणी घातली. रोहित शर्माने देखील पुनरागमन करून आपल्या नेतृत्वात सलग १३ टी-२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला.