ठळक मुद्देविंडीजविरुद्धची मालिका आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताला महत्त्वाची ठरणार संघात सातत्याने होत असलेले बदल किंवा करण्यात येणारे प्रयोग योग्य आहेत का कदाचित प्रत्येक सामन्यात बदल पाहण्यास मिळतीलसर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असतील, तर नक्कीच प्रयोग कमी होतात.
- अयाझ मेमन
विंडीजविरुद्धची मालिका आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताला महत्त्वाची ठरणार आहे. संघात खूप बदल झाले असून अनेक प्रयोगही करण्यात आले आहेत. त्याचवेळी अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले. संघात सातत्याने होत असलेले बदल किंवा करण्यात येणारे प्रयोग योग्य आहेत का अशी विचारणाही होत आहे. निवड समितीचे काम १५-१६ सदस्यांचा संघ निवडण्याचे आहे. परंतु, अंतिम अकरा खेळाडूंची निवड करण्याची पूर्ण जबाबदारी कर्णधार, उपकर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यावर असते. त्यामुळेच कदाचित प्रत्येक सामन्यात बदल पाहण्यास मिळतील, कारण प्रत्येक सामन्यासाठी परिस्थिती वेगळी असते.
जेव्हा तुम्ही विजयाच्या शोधात असता तेव्हा नक्कीच हे बदल प्रकर्षाने दिसून येतात. अशावेळी कधीकधी चुकाही होतात जे आपल्याला इंग्लंड दौºयातही पाहण्यास मिळाले. परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असतानाही कुलदीपला खेळविण्याचा प्रयोग झाला. पण याचा अर्थ असा नाही, की तुम्ही प्रयोग करणे सोडायला पाहिजे. जर संघ विजयी लयीत असेल, सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असतील, तर नक्कीच प्रयोग कमी होतात. आज प्रत्येक राष्ट्रीय संघ प्रयोग करताना दिसत आहे. कारण जेव्हा कोणताही संघ विदेशी दौºयावर जातो, तेव्हा त्या संघाची कामगिरी सकारात्मक होत नाही. त्यामुळे बदल झालेले पाहण्यास मिळतात. दुसरे कारण म्हणजे एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जवळ येत असून सर्वच संघ या स्पर्धेसाठी आपली बाजू भक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे.
विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पृथ्वी शॉने शानदार पदार्पण केले. त्याचे अनेकांनी कौतुक केले. आतापर्यंत तो सर्व संघात सलामीवीर म्हणून खेळला आहे. १९ वर्षांखालील भारताच्या संघातही तो सलामीवीर म्हणूनच खेळला. सध्या सुरु असलेल्या हजारे चषक स्पर्धेतही मुंबईकडून डावाची सुरुवात करताना तो खोºयाने धावा करत आहे. एकूणच भारतीय क्रिकेटला पृथ्वीच्या रुपाने एक गिफ्ट मिळाले आहे. कारण त्याची खेळण्याची मानसिकता माझ्यामते क्रिकेटसाठी अचूक आणि आदर्श अशीच आहे असे वाटते. तो जणू क्रिकेटसाठीच जन्माला आल्याचे भासते. रवी शास्त्री यांनी त्याची तुलना सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली. तरी पृथ्वीवर अपेक्षांचे ओझे टाकू नये असे माझे ठाम मत आहे. कारण सचिन तेंडुलकर २४ वर्ष आणि वीरेंद्र सेहवाग १२ वर्ष खेळले आणि आत्ता कुठे पृथ्वीच्या कारकिर्दची सुरुवात झाली आहे. पण त्याने जी गुणवत्ता दाखवली ती अप्रतिम आहे. तरी घरच्या मैदानावर विंडीजसारख्या हलक्या संघ्याविरुद्ध खेळणे त्याच्यासाठी शिकण्याची प्रक्रीया होती. आता तो जेव्हा आॅस्टेÑलिया दौºयावर जाईल, तिथे त्याची खरी परीक्षा होईल. या दौºयातून कळेल पृथ्वी आपल्या कारकिर्दीत कसा पुढे जाईल.
विंडीजविरुद्धची कसोटी मालिका भारताने सहज जिंकली. तिथे खास स्पर्धा यजमानांना मिळाली नाही. पण एकदिवसीय व टी२०मध्ये मालिकेत चित्र वेगळे दिसेल. टी२० मध्ये विंडीज संघ वर्ल्ड चॅम्पियन आहे हे विसरता कामा नये. शिवाय द्वेन ब्रावो, सुनिल नरेन, आंद्रे रसेल असे प्रमुख खेळाडू संघात पुनरागमन करत आहेत. त्यामुळे या विंडीज संघाची तुलना कसोटी संघाशी केली जाऊ शकत नाही. म्हणूनच एकदिवसीय व टी२० मालिकेत भारताला विंडीजविरुद्ध खेळताना सावध रहावे लागेल. त्याचबरोबर भारताने या मालिकेतून काही प्रयोग केले पाहिजेत. ही यजमानांना एक संधी आहे.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: The captain, coach is responsible for the final team selection
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.