कटक- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या खेळाबरोबरच शांत स्वभावासाठी ओळखला जातो. अगदी कमी वेळा धोनीला सामन्यादरम्यान मैदानावर चिडलेला पाहायला मिळातं. अनेत कठीण प्रसंगात धोनी स्वतःला शांत ठेवतो. धोनीच्या या सवयीमुळे त्याला दिग्गज कूल क्रिकेटर म्हणतात. बुधवारी कटकमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात एक असा क्षण होता ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी खूप रागात दिसला.
झालं असं, सामन्यातील 17 वी ओव्हर मनीष पांडे टाकत होता. त्याचदरम्यान, साइट्स स्क्रीनजवळ असलेल्या एका कॅमेरामॅनमुळे मनीष पांडेचं लक्ष विचलित होत होतं. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, साइट्स स्क्रीनजवळ असणारा कॅमेरामॅन तेथे थांबून काहीतरी चुळबूळ करत होता. ज्यामुळे मनीष पांडे बॉलिंगकडे लक्ष केंद्रीत करू शकत नव्हता. हा सर्व प्रकार दुसऱ्या बाजूला असणाऱ्या धोनीने पाहिलं. कॅमेरामॅनचा हा प्रकार पाहून धोनी चिडला व कॅमेरामॅनच्या दिशेने गेला. धोनी येत असल्याचं पाहून त्या कॅमेरामॅनने तेथून पळ काढला. कॅमेरामॅनच्या या कृतीमुळे काही वेळासाठी धोनी फ्रस्ट्रेट झालेला पाहायला मिळाला.
दरम्यान, याआधी ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या एका मॅचदरम्यान धोनी टीम इंडियाचा प्लेअर केदार जाधववर चिडलेला पाहायला मिळालं होतं.
पहिल्या टी -20 सामन्यामध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात श्रीलंकेचे फलंदाज अडकले. भारतीय संघानं केलेल्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारतानं 93 धावानं विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा हा टी-20 च्या इतिहासातीस सर्वात मोठा विजय आहे. भारताने उभारलेल्या १८० धावांचा पाठलाग करताना लंकेचा डाव १६ षटकांत केवळ ८७ धावांत संपुष्टात आला. युझवेंद्र चहल (४/२३), हार्दिक पांड्या (३/२९) यांनी अचूक मारा करत लंकेची दाणदाण उडवली. चहलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
बाराबती स्टेडियमवर लंकेने आक्रमक सुरुवात केली खरी, मात्र जयदेव उनाडकटने निरोशन डिकवेला (१३) याला बाद करून लंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. यानंतर ठराविक अंतराने लंकेचे फलंदाज बाद झाले. अनुभवी सलामीवीर उपुल थरंगा याने १६ चेंडंूत एक चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक २३, तर कुशल परेराने २८ चेंडूत १९ धावांची खेळी केली. याशिवाय, अँजेलो मॅथ्यूज (१), असेला गुणरत्ने (५), दासून शनाका, थिसारा परेरा (३) हे सपशेल अपयशी ठरले. चहल व हार्दिक यांनी भेदक मारा करत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तत्पूर्वी, सलामीवीर लोकेश राहुलचे (६१) शानदार अर्धशतक व महेंद्रसिंग धोनी - मनीष पांडे यांची नाबाद अर्धशतकी भागीदारी या जोरावर भारताने ३ बाद १८० धावांची मजल मारली. राहुल अर्धशतक झळकावून बाद झाल्यानंतर धोनी - पांडे यांनी ६८ धावांची नाबाद भागीदारी करून भारताला मजबूत धावसंख्या उभारली. मॅथ्यूजने कर्णधार रोहित शर्माला (१७) बाद करून भारताला ५व्या षटकात मोठा धक्का दिला. यानंतर लोकेश राहुलने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत ४८ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ६१ धावांची निर्णायक खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसह (२४) दुसºया विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. अय्यर व राहुल ११ धावांच्या फरकाने बाद झाल्यानंतर धोनी - पांडे यांनी लंका गोलंदाजीचा समाचार घेतला.