Hardik Pandya joins Mumbai Indians ( Marathi News ) - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सर्व उत्सुक असतील ते मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी होते, हे पाहण्यासाठी. कारण, गेली अनेक वर्ष ज्या रोहित शर्माकडे Mumbai Indians चे नेतृत्व होतं, तो या पर्वात फक्त एक फलंदाज म्हणून मैदानावर असणार आहे. MI फ्रँचायझीने ट्रेडिंग विंडोमध्ये गुजरात टायटन्सच्या हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्तात पुन्हा घेतले आणि कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली. २२ मार्चपासून आयपीएल २०२४ ला सुरुवात होतेय आणि पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू भिडणार आहेत.
मुंबई इंडियन्सही नव्या सुरुवातीसाठी सज्ज झाले आहेत आणि हार्दिकने संघाच्या नेतृत्वाची सूत्र काल हाती घेतली. फ्रँचायझीने हार्दिकच्या स्वागताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात हार्दिक मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांची गळाभेट घेताना दिसतोय आणि त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये त्याने देवाची पूजा केल्याचे पाहायला मिळतेय. हार्दिकने आयपीएल २०२२च्या पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सला जेतेपद पटकावून दिले आणि गेल्या वर्षीही त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने अंतिम फेरी गाठली होती.