ख्राईस्टचर्च : कर्णधार केन विलियम्सनचे सलग तिसरे शतक आणि हेन्री निकोल्ससोबत त्याने केलेल्या नाबाद २१६ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर सोमवारी पाकिस्तानविरुद्ध पहिल्या डावात आघाडी मिळविण्याकडे कूच केली.
पाकला पहिल्या डावात २९७ धावात बाद करणाऱ्या न्यूझीलंडने ३ बाद २८६ अशी वाटचाल केली. प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत हा संघ ११ धावांनी मागे आहे, निकोल्स ८९ धावांवर खेळत आहे. त्याने विंडीजविरुद्ध १७४ आणि पाकविरुद्ध पहिल्या सामन्यात ५६ धावांचे योगदान दिले. यजमानांची ३ बाद ७१ अशी पडझड झाली होती. त्याचवेळी दडपणात खेळायला आलेल्या विलियम्सनने निकोल्सच्या सोबतीने धावसंख्येला आकार दिला.
पाकच्या वेगवान माऱ्याला यशस्वी तोंड देत न्यूझीलंडने दोन गडी ६६ धावात गमावले होते. दुसऱ्या सत्रात ७९ धावांची भर पडली मात्र रॉस टेलरचा बळी द्यावा लागला.उपहाराआधी टॉम ब्लंडेल (१६)आणि टॉम लॅथम (३३) बाद झाले. दोघांनी ५२ धावांची सलामी दिली. टेलर (१२) मोहम्मद अब्बासच्या चेंडूवर स्लीपमध्ये झेलबाद झाला.
विलियम्सनने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत २५१ धावांची खेळी केल्यानंतर पाकविरुद्ध पहिल्या कसोटीत पुन्हा १२९ धावा केल्या होत्या. आज दुसऱ्या दिवसअखेर तो ११२ धावा काढून नाबाद आहे. विलियम्सनचे हे २४ वे शतक आहे.