मुंबई, दि. 7- भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राज हिला पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं. बुधवारी मितालीने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत मितालीने घातलेल्या कपड्यांवरुन तिला ट्रोल करण्यात आलं. मितालीने घातलेला ड्रेस योग्य नसल्याचं नेटीझन्सचं म्हणणं होतं. तसंच तिने तो फोटो डिलीट करावा, असं मत ट्विटर युजर्स व्यक्त करत होते. पण यावरून काही युजर्सनी मितालीचं समर्थनही केलं. मिताली राजने ट्विटरवर मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोवरुन नेटिझन्सनी तिखट प्रतिक्रिया दिली. ‘मिताली तू बोल्ड फोटो शेअर केला असून तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही’ असं एका युजरने म्हटलं आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमचं उत्कृष्ट नेतृत्व करत असल्याने तु अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेस. त्यामुळे असे कपडे घालणं तुम्हाला शोभत नाही, हा फोटो डीलीट करा सल्लाही काही यूजर्सनी दिला. पण ट्विटरवर सुरू असलेल्या या ट्रोलवर कॅप्टन मिताली राजने अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मिताली राजला यापूर्वीही ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी मितालीने बंगळुरुत क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केलं होते. यावेळी मितालीने वेदा कृष्णमुर्ती, ममता माबेन आणि नुशीन अल खादीर यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता. यावेळी एका युजरने मितालीच्या काखेत आलेल्या घामावरुन तिची खिल्ली उडवली होती. सोशल मीडियावरील या टीकेवरून मितालीने टीकाकारांना तसंच सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘मी ज्या ठिकाणी उभी आहे, ते फक्त मैदानात अती कष्ट करुन घाम गाळल्यामुळेच. त्यामुळे घामाची मला अजिबात लाज वाटण्याचं कारण नाही.’ असं उत्तर मितालीने नेटिझन्सना दिलं होतं.
महिला विश्वचषकात भारतीय क्रिकेट टीमला फायनल मॅचपर्यंत पोहचविण्यासाठी मितालीने तसंच क्रिकेट टीममधील इतर खेळाडुंनी अथक मेहनत घेतली होती. विश्वचषकातील कामगिरीमुळे मिताली राजचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. तसंच मिताली आणि टीममधील खेळाडुंचा अनेक बक्षीस देऊनही गौरव करण्यात आला होता.