इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वासाठी ८ फ्रंचायझींनी आपापल्या ताफ्यातील काही खेळाडूंना कायम राखले आणि आता कोणाला ताफ्यात घ्यायचे याचे डावपेच आखताना दिसत आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) आयपीएल २०२२साठी रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना कायम राखले आहे. फॅफ ड्यू प्लेसिस व ड्वेन ब्राव्हो हे स्टार या लिस्टमधून गायब झाल्यानं चाहते काहीसे निराश आहेत. पण, फॅफची उणीव भरून काढण्यासाठी CSKनं एका २४ वर्षीय तगड्या खेळाडूला ट्रायलसाठी बोलावलं आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील छोट्याश्या कारकीर्दित या खेळाडूनं २४ षटकार खेचले आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये ओडिशाकडून खेळणारा हा खेळाडू आता CSKसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
चेन्नई सुपर किंग्सनं ओडिशाचा कर्णधार सुभ्रांशू सेनापती (Subhranshu Senapati ) याला ट्रायल साठी बोलावलं आहे. ओडिशा क्रिकेटनं ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी विजय हजारे ट्रॉफी व सय्यर मुश्ताक अली ट्रॉफीतील सुभ्रांशूच्या कामगिरीच्या काही क्लिप शेअर केल्या आहेत. या दोन स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावरच CSKनं त्याला ट्रायलसाठी बोलावलं आहे.