मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ५ बाद २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) फलंदाजांना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. DCला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. MIने ५७ धावांनी हा सामना जिंकून सहाव्यांदा IPLच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड शून्यावर बाद होऊनही मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)च्या अन्य फलंदाजांनी धमाकेदार खेळ केला. क्विंटन डी'कॉक ( ४०), सूर्यकुमार यादव ( ५१), इशान किशन ( ५५*) आणि हार्दिक पांड्या ( ३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं ५ बाद २०० धावांचा डोंगर उभा केला. हार्दिकनं १४ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, इशाननं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. या दोघांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली.
मुंबईनं उभ्या केलेल्या तगड्या आव्हानाचा भार दिल्लीचे आघाडीचे फलंदाज पेलवू शकले नाही. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे बाद झाले. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात शिखऱ धवनला बाद केले. दिल्लीचे आघाडीचे तीनही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. कर्णधार श्रेयस अय्यर ( १२) व रिषभ पंत ( ३) हेही अपयशी ठरले. मार्कस स्टॉयनिस आणि अक्षर पटेल यांनी दिल्लीची लाज वाचवली. स्टॉयनिस ६५ धावांवर माघारी परतला. अक्षर पटेलनं ४२ धावा केल्या. बुमराहनं ४ षटकांत १ निर्धाव षटकासह १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्टनं ( २/९) दोन, तर कृणाल पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
सर्वांची कामगिरी चोख झालेली असताना राहुल चहरला मात्र महागडा ठरला. त्याच्या दोन षटकांत DCच्या फलंदाजांनी ३५ धावा चोपल्या. पण, विजयानंतर रोहितनं फिरकीपटू राहुल चहरचे मनोबल वाढवले. त्यानं ड्रेसिंग रुमपर्यंत टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राहुलकडे सोपवली. रोहितच्या या कृतीनं सोशल मीडियावर कॅप्टन असाव तर असा... अशी कौतुकपर चर्चा रंगली आहे.