IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले आहे. भारतीय संघाने दुसरी कसोटी जिंकली तरी मालिकेत बरोबरी साधता येईल. कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.
पहिल्या कसोटीत भारतीय संघाच्या पराभवामागचे कर्णधार रोहित शर्माचे कारण सांगितले आहे. रोहितने दोन्ही डावातील खराब फलंदाजी हे पराभवाचे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं आहे. तसेच, गोलंदाजांच्या कामगिरीवर रोहित फारसा खूश दिसला नाही. रोहित म्हणाला की, जिंकण्यासाठी संपूर्ण संघाला सामूहिक प्रयत्न करावे लागतील, जे या सामन्यात होऊ शकले नाही. रोहितने केएल राहुलचे कौतुकही यावेळी केले.
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही जिंकण्यासाठी पुरेसे चांगले नव्हतो. प्रथम फलंदाजीला आल्यानंतर केएलने चांगली फलंदाजी केली आणि आम्हाला ती धावसंख्या मिळवून दिली, पण त्यानंतर आमच्या गोलंदाजांना परिस्थितीचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर आज फलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नाही. याआधीही काही खेळाडू इथे आले आहेत. हे चौकार ठोकण्याचे मैदान आहे, असं रोहितने सांगितले.
पहिल्या डावात लोकेश राहुल (१०१) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवताना (७६) धावा केल्या. पण, 'विराट' खेळी सुरू असताना दुसरीकडे भारताच्या एकाही खेळाडूला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघावर दबाव वाढला होता. विराट कोहलीने अखेरपर्यंत संघर्ष केला पण टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या ३४.१ षटकांत १३१ धावांवर सर्वबाद झाला.