मुंबई - एकेकाळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक बनणे हे अशक्य मानले जात होते. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीयांनी अशक्य ते शक्य करून दाखवताना वनडेत द्विशतक फटकावण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर रोहित शर्माने वनडेत दोन द्विशतके फटकावत या दोघांपेक्षा सवाई कामगिरी करून दाखवली. त्यातील दुसऱ्या द्विशतकावेळी रोहितने 264 धावा फटकावून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला होता. 13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात रोहित शर्माने तुफानी फटकेबाजी करत एकदिवसीय क्रिकेटमधील वैयक्तिक धावसंख्येचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. या सामन्यात रोहित शर्मा फलंदाजीस आल्यावर वैयक्तिक चार धावांवर त्याचा झेल सुटला होता. या जीवदानाचा फायदा घेत रोहित शर्माने ही विक्रमी खेळी साकारली होती. रोहितने या खेळीदरम्यान 33 चौकार आणि 9 षटकार लगावले होते. विशेष म्हणजे याआधीही त्याने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावण्याचा पराक्रम केला होता. 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू येथे झालेल्या सातव्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 209 धावा फटकावल्या होत्या. दरम्यान, 264 धावांची खेळी करताना रोहितने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा फटकावण्याचा वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला होता. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात 250 धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. एकदिवयीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटून बेलिंडा क्लार्क हिने एका डावात 229 धावा फटकावण्याचा पराक्रम केला होता. रोहितच्याआधी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो विश्वविक्रम होता. त्या सामन्यात भारताने 50 षटकांत 404 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेला 251 धावांत गुंडाळत भारताने 153 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सहा द्विशतके फटकावली गेली आहेत. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, ख्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांनी वनडेत द्विशतकी खेळी केल्या असून, रोहित शर्माने हा कारनामा दोन वेळा केला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- चार धावांवर सुटला होता कॅच, संधीचा फायदा उठवत रोहित शर्माने बनवला होता वर्ल्ड रेकॉर्ड
चार धावांवर सुटला होता कॅच, संधीचा फायदा उठवत रोहित शर्माने बनवला होता वर्ल्ड रेकॉर्ड
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीयांनी अशक्य ते शक्य करून दाखवताना वनडेत द्विशतक फटकावण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर रोहित शर्माने वनडेत दोन द्विशतके फटकावत या दोघांपेक्षा सवाई कामगिरी करून दाखवली.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 6:19 PM