भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला. धर्मशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा निकाल लागला. घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग १७वा कसोटी मालिका विजय ठरला.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने सामना संपल्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे. रोहित म्हणाला की, तो सध्या चांगले क्रिकेट खेळत आहे. पण आपली तब्येत बरी नसल्याचे लक्षात येताच तो निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४४.४४च्या सरासरीने ४०० धावा केल्या. यामध्ये रोहितने दोन शतक आणि एक अर्धशतक झळकावले.
रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?
एकेदिवशी मी उठल्यावर मला मी आता फार चांगला खेळत नाहीये, मी हा खेळ खेळण्या योग्य राहिलो नाही असं वाटेल त्याक्षणी मी निवृत्ती घेईन. परंतु खरं सांगू का मला गेल्या दोन ते चार वर्षापासून माझी कामगिरी उंचावली असल्याचं मला वाटतं. मी सध्या माझं बेस्ट क्रिकेट खेळत आहे, असं रोहितने सांगितले. जेव्हा तुम्ही अशी कसोटी जिंकता, तेव्हा सर्व काही व्यवस्थित होते. या युवा खेळाडूंकडे अनुभवाची कमतरता असेल, पण त्यांनी भरपूर क्रिकेट खेळले आहे. इथे उभं राहून मी बघू शकतो की या मुलांनी दडपणाखाली चांगली कामगिरी केली आहे. या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते, असं रोहित यावेळी म्हणाला.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ धावा केल्या होत्या. झॅक क्रॉली (१०८ चेंडू ७९ धावा) वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. पाहुण्या संघाकडून बेन डकेट (२७), ओली पोप (११), जो रूट (२६), जॉनी बेअरस्टो (२९), बेन स्टोक्स (०), बेन फोक्स (२४), टॉम हर्टली (६), मार्क वुड (०) आणि शोएब बशीरने नाबाद ११ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर आर अश्विन (४) आणि रवींद्र जडेजाला (१) बळी घेण्यात यश आले.
भारताचा पहिला डाव
इंग्लंडने २१८ धावा केल्यानंतर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात ४७७ धावा करून २५९ धावांची चांगली आघाडी घेतली. रोहित शर्मा (१०३), शुबमन गिल (११०), यशस्वी जैस्वाल (५७), देवदत्त पडिक्कल (६५) आणि सर्फराज खान (५६) यांनी अप्रतिम खेळी करून इंग्लिश संघासमोर धावांचा डोंगर उभारला. याशिवाय रवींद्र जडेजा (१५), आर अश्विन (०), कुलदीप यादव (३०), जसप्रीत बुमराहने (२०) धावा केल्या. पाहुण्या संघाकडून शोएब बशीरने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर बेन स्टोक्स (१) आणि जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टली यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले.
इंग्लंडचा दुसरा डाव
यजमान संघाने २५९ धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभे राहिले. या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचून सन्मानजनक धावसंख्या उभारण्याची मोठी जबाबदारी बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील संघावर होती. पण, इंग्लिश संघ पूर्णपणे अपयशी ठरला अन् सामना एक डाव आणि ६४ धावांनी गमवावा लागला. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाकडून जो रूटने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली आणि जॉनी बेअरस्टोने (३९) धावा केल्या. यांच्याशिवाय एकाही शिलेदाराला २० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियाकडून आर अश्विनने सर्वाधिक (५) बळी घेऊन इंग्लिश संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली. तर जसप्रीत बुमराह (२) आणि कुलदीप यादव (२) आणि रवींद्र जडेजाला (१) बळी घेण्यात यश आले.