रोहित शर्माची ( Rohit Sharma) टीम इंडियाच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावर विराजमान होण्याची घोषणा बुधवारी बीसीसीआयनं केली. त्यानंतर रोहितचं १० वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयनं कसोटी संघाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी लगेचच यापुढे रोहित शर्मा हा वन डे संघाचाही कर्णधार असेल असे जाहीर करून सर्वांना धक्का दिला.
रोहितला २०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळालं नव्हतं आणि तोच रोहित आता २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. रोहितनं त्यावेळी केलेलं ट्विट कालपासून पुन्हा व्हायरल झालं आहे. १७ एप्रिल २०१०ला त्यानं एक ट्विट केलं होतं. त्यात त्यानं म्हटलं होतं की,''वर्ल्ड कप संघात मी स्थान डिझर्व्ह करतो का, असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी माझ्या बॅटीनेच उत्तर देईन.''
पण, २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितला संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यानं ट्विट केलं की,''वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्यानं निराश झालोय. पण मला यातून पुढे चालायला हवं, परंतु खरं सांगायचं तर हा माझ्यासाठी मोठा धक्का आहे.''