Join us  

मोठी बातमी! तुला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकायचाय असं म्हणायचंय का? रोहितने चर्चेला दिला पूर्णविराम

ind vs sa test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 4:30 PM

Open in App

सेंच्युरियन : वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात यजमान भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. विश्वचषकातील पराभवानंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर रोहित आणि विराट कोहली मैदानात दिसणार आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे मंगळवारपासून कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. खरं तर आतापर्यंत भारताला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकता आली नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघासमोर मोठे आव्हान असेल. सलामीच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत आपली रणनीती स्पष्ट केली.

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी रोहितला ट्वेंटी-२० विश्वचषकाबद्दल प्रश्न केला असता भारतीय कर्णधाराने मिश्किलपणे उत्तर दिले. आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी देखील असणार आहे. सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपली रणनीती स्पष्ट करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. रोहितने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत भारताला अद्याप विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मला जगातील या भागात कोणीही जे साध्य केले नाही ते साध्य करायचे आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळे नसेल याची कमी आम्हाला भासेलच... पण दुसरा कोणता गोलंदाज ही कमी भरून काढले अशी आशा आहे. पण ते काम सोपे असणार नाही. आम्ही अद्याप आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलो नाही. जर यावेळी जिंकलो तर विश्वचषकातील पराभवाची झळ भरून निघेल असे मी म्हणणार नाही. कारण तो पराभव आणि या मालिकेची तुलना होऊ शकत नाही, असेही रोहित शर्माने सांगितले. 

ट्वेंटी-२० विश्वचषकाबद्दल सूचक विधान रोहित शर्मा विश्वचषकातील पराभवानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बोलला. यावेळी तो निराश आणि हताश दिसला. आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकण्याचे आव्हान असल्याचे त्यांच्या तोंडावर स्पष्टपणे दिसत होते. अशातच पत्रकाराने त्याला प्रश्न केला की, जेव्हा तू निराशेबद्दल बोलत असतो तेव्हा तुला ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकायचा आहे असं म्हणायच असतं का? यावर रोहितने मिश्किलपणे म्हटले, "मला माहित आहे तू माझ्याकडून काय शोधत आहेस, तुला काय उत्तर हवं आहे याची मला कल्पना आहे. तुला लवकरच उत्तर मिळेल." 

कसोटी मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा. 

मालिकेचे वेळापत्रक २६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून (सेंच्युरियन)३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून  (केपटाउन)   

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024