Ranji Trophy 2024 Final ( Marathi News ) : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तयारीसाठी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये जाणे अपेक्षित होते. पण, त्याने तसे नाही केले. कसोटी मालिका सुरू असताना रोहितने युवा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्या असा सल्ला दिला होता आणि आज तो थेट वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेची फायनल पाहण्यासाठी पोहोचला. मुंबईने फायनलमध्ये विदर्भ संघाला बॅकफूटवर फेकले आहे आणि ड्रेसिंग रुममध्ये बसून रोहित या सामन्याचा आनंद लुटताना दिसला. त्याने देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य द्या असे म्हटले आणि स्वतःही सामना पाहायला पोहचल्याने साऱ्यांचे मन जिंकले.
BCCI ने ट्विट केलेल्या व्हिडीओत रोहित वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीसोबत मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला आहे. धवल कुलकर्णी हा मुंबईचा वेगवान गोलंदाजच नाही तर रोहित शर्माचा खूप चांगला मित्रही आहे. धवलचा हा शेवटचा प्रथम श्रेणी क्रिकेट सामना आहे, यानंतर तो निवृत्त होणार आहे.
मुंबईकडे ५०० पार आघाडी...
मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मुंबईने पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी घेतली. अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावात १४३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७३ धावा केल्या. श्रेयस अय्यरने १११ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९५ धावा केल्या. १९ वर्षीय मुशीर खान याने ३२६ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने १३६ धावांची खेळी केली. मुंबईने ८ बाद ४०२ धावा करून ५२१ धावांची आघाडी घेतली आहे.
मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक कॅम्पमध्ये दाखलMI फ्रँचायझीने ट्रेडिंग विंडोमध्ये गुजरात टायटन्सच्या हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्तात पुन्हा घेतले आणि कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली. २२ मार्चपासून आयपीएल २०२४ ला सुरुवात होतेय. मुंबई इंडियन्सही नव्या सुरुवातीसाठी सज्ज झाले आहेत आणि हार्दिकने संघाच्या नेतृत्वाची सूत्र काल हाती घेतली. फ्रँचायझीने हार्दिकच्या स्वागताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात हार्दिक मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांची गळाभेट घेताना दिसतोय आणि त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये त्याने देवाची पूजा केल्याचे पाहायला मिळतेय.