सुनील गावसकर -
मोटेरा स्टेडियमवर भारतीय संघाला एक हजारावा एकदिवसीय सामना खेळताना बघणे हा एक सुखद अनुभव असेल. मात्र दु:ख एकाच गोष्टीचे राहील की कोरोनामुळे प्रेक्षकांना या ऐतिहासिक सामन्याचा आनंद घेता येणार नाही. तरीही भारतीय खेळाडूंना हा सामना प्रेरणा देणारा ठरेल. कारण घरी बसून हा सामना बघणाऱ्या प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक खेळाडू नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. विशेषत: गेल्या काही कठीण काळानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा आनंदी होण्याची संधी मिळणार आहे. काही खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकले. मात्र त्यातल्यात्यात एक गोष्ट बरी झाली की, पूर्ण भारतीय संघाला याची लागण झाली नाही. कोरोनाग्रस्त झालेले खेळाडू या सामन्यासाठी उपलब्ध नसतीलही, पण भारताकडे प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. शिवाय संधीच्या शोधात असलेले हे खेळाडू अपेक्षेपेक्षा निश्चितच चांगला खेळ करू शकतात.
भारतीय संघाची धुरा आता रोहित शर्माच्या हाती आहे. याआधीही रोहितने ही जबाबदारी पार पाडली होती. मात्र तेव्हा त्याच्याकडे पूर्णवेळ कर्णधारपद नव्हते. कोहली उपलब्ध नसला की त्याला ही कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडावी लागत असे. त्यामुळे आता पूर्णवेळ कर्णधार झालेला रोहित शर्मा असा एक मैलाचा दगड गाठण्याचा प्रयत्न करेल ज्यात केवळ दोन देशांमधील मालिकाच नाही तर अनेक देशांचा समावेश असलेला स्पर्धा जिंकण्याबाबत भारत प्रयत्नशील राहील. असे काम रोहितने २०१८ साली आशिया चषक जिंकून यशस्वीरीत्या पार पाडले आहे. त्यामुळे रोहितला काय करायचे आहे, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.
एकदिवसीय क्रिकेटला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वेस्ट इंडीजच्या संघाचा दबदबा होता. मात्र त्यानंतर अन्य संघही पुढे यायला लागले आणि आता तर परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. तरीही आज कोणताच संघ वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची जोखीम पत्करणार नाही. रोहित शर्मालाही याची पूर्ण जाण आहे. निश्चितच नेहमीप्रमाणे खेळपट्टीची भूमिका या सामन्यातही महत्त्वाची ठरेल. या खेळपट्टीवर धावांची बरसात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने जेव्हा आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हा भारताकडून पहिला षटकार माझ्यासारख्या पामराने लगावला होता. त्यामुळे आता १ हजारावा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाकडून पहिला षटकार कोण मारणार? जर हे काम भारतीय कर्णधारने केले तर अजिबात नवल वाटणार नाही. (टीसीएम)
Web Title: Captain Rohit's eye on winning big tournament, happy to watch 1000th match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.