smriti mandhana wpl । मुंबई : सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा (WPL) थरार रंगला आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील आरसीबीच्या संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. सलग चौथ्या सामन्यात पराभव झाल्याने कर्णधार मानधना भावूक झाल्याचे पाहायला मिळाली. महिला प्रीमिअर लीगमध्ये आपल्या संघाच्या खराब सुरुवातीबद्दल स्मृतीने एक मोठे विधान केले आहे. संघाची सुरुवात चांगली झाली नसली तरी आरसीबीचे सर्व खेळाडू पूर्णपणे एकमेकांची साथ देत आहेत हे पाहून खूप बरे वाटते असे स्मृतीने म्हटले.
कठीण काळात प्रत्येक खेळाडू एकमेकांसोबत आहे - मानधनारॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. त्याआधी, स्मृती मानधना आरसीबीच्या यूट्यूब चॅनेलवरील संभाषणात म्हणाली, "ही खरंच खूप कठीण सुरुवात आहे. चौथ्या सामन्यानंतर आम्ही ड्रेसिंग रूममध्ये खूप चर्चा केली आणि सर्वांना एक मेसेज देण्यात आला. आम्ही एक संघ म्हणून ज्या ठिकाणी आहोत हे बरोबर नाही पण खेळाडूंनी आतापर्यंत खूप चांगली साथ दिली आहे. हे सर्व खेळाडू एकमेकांना असे सपोर्ट करतील अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती."
यापूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिसे पेरीने स्मृती मानधनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. "मानधना ही एक उत्कृष्ट कर्णधार आहे आणि तिला स्पर्धेत आपले पाय रोवण्याची संधी हवी आहे. नवीन स्पर्धेत येणे आणि यापूर्वी कधीही न खेळलेल्या खेळाडूंच्या गटाशी खेळणे हे एक कठीण काम आहे. तसेच या गटात सामील झाल्यापासून अवघ्या काही दिवसांत हे सर्व करण्याचा स्मृतीने प्रयत्न केला आहे. या स्पर्धेतून तिला खूप काही शिकायला मिळाले आहे", अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने मानधनाचे कौतुक केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"