नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच विश्वचषकांना गवसणी घातली आहे. पण ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवून देणारा एक कर्णधार मात्र सध्याच्या घडीला कॅन्सरशी लढतो आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क सध्या त्वचेच्या कॅन्सरशी झुंजत आहे. 2015 साली झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने क्लार्कच्या नेतृत्वाच्या जोरावर विश्वचषक जिंकला होता.
ऑस्ट्रेलियाला 2015 साली विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर क्लार्कने क्रिकेटला अलविदा केला होता. काही दिवसांपासून क्लार्क समालोचन करत होता. विश्वचषकाबरोबरच क्लार्कने संघाला बरेच विजय मिळवून दिले होते. पण रविवारी क्लार्कने आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून कॅन्सरबाबत सांगितले आहे.
क्लार्कने आपल्या इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो अपलोड केला आहे. ज्यामध्ये क्लार्कने आपल्या डोक्यावर हात ठेवला आहे. या फोटोमध्ये क्लार्कच्या डोक्यावर एक निशाण दिसत आहे. क्लार्कच्या डोक्यावर सर्जरी करण्यात आली असून त्या सर्जरीचा मार्क क्लार्कच्या डोक्यावर दिसत आहे.
क्लार्कने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, " माझ्या चेहऱ्यावर अजून एक कॅन्सरची खूण आली आहे. माझी सर्व युवा पिढीला विनंती आहे की, सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी उपयुक्त पावले तुम्ही उचलायला हवीत."