अँटिग्वा - शतकी खेळी करणारा कर्णधार यश धुल याने शेख रशिदसोबत केलेली धडाकेबाज द्विशतकी भागीदारी आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने सलग चौथ्यांदा तर एकूण आठव्यांदा अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांमध्ये ५ बाद २९० धावांचा डोंगर उभारल्यानंतर २९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ ४१.५ षटकांत १९४ धावा काढून गारद झाला. आता ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम लढतीत भारतीय संघाची गाठ ही इंग्लंडशी पडणार आहे.
कर्णधाराच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २९१ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांची पहिली विकेट ३ धावांवर पडली. टी विली याला बाद करत रवी कुमारने कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर कँपबेल आणि कोरी मिलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. रघुवंशीने ही जोडी फोडताना कोरीला पायचित केले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. केवळ लेचनन शॉ याने एक बाजू लावून धरत भारतीय माऱ्याचा सामना केला. तर जॅक सिनफिल्डने १४ चेंडूत २० धावांची खेळी केली.
शॉ याने ६६ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. तो संघाच्या १७८ धावा झाल्या असताना नवव्या विकेटच्या रूपात बाद झाला. त्याच्याशिवाय कोरी मिलरने ३८ आणि कँपबेलने ३० धावा केल्या. भारताकडून डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल याने ४२ धावांत ३ बळी टिपले. तर निशांत सिंधू आणि रवी कुमारने प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी धाडले. कौशल तांबे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या १२.३ षटकांत २ बाद ३७ असा धावफलक असताना कर्णधार यश धुल मैदानावर उतरला आणि त्यानं शेख रशिदसह ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाची धुलाई केली. या दोघांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारतानं ५० षटकांत ५ बाद २९० धावांचा डोंगर उभा केला. यश धुलने शतकी खेळी करताना इतिहास रचला, तर रशिदचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.
अंगक्रीश रघुवंशी ( ६) व हर्नूर सिंग ( १६) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर यश व रशिद यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी केली. यश ११० चेंडूंत १० चौकार १ षटकारासह ११० धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ राशिदही १०८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ९४ धावांवर बाद झाला. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये दिनेश बानानं ४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद २० धावा करून संघाला २९० धावांपर्यंत पोहोचवले. भारताने अखेरच्या १० षटकांत १०८ धावा चोपल्या.