भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली वन डे सामन्यांची मालिका १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. विराट कोहली या मालिकेत खेळणार आहे आणि आता तो कर्णधारपदाच्या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त झालेला आहे. शनिवारी त्यानं कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं विराटच्या या निर्णयावर मोठं विधान केलं आहे. कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो, वेळ आल्यावर ती जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवावी लागते, असे गंभीर म्हणाला.
स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात गंभीर म्हणाला, ''कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो. महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूनंही कर्णधारपदाची बॅटन विराट कोहलीकडे सुपूर्द केली होती. तोही कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. धोनीनं तर तीन आयसीसी स्पर्धा आणि चार आयपीएल ट्रॉफी उंचावल्या आहेत. त्यामुळे आता कोहलीनं धावा बनवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. ते जास्त महत्त्वाचे आहे.''