क्रिकेटच्या मैदानात रविवारी एक विचित्र किस्सा घडला. क्रिकेटचा सामना सुरू असतानाच ही भयानक घटना घडली. ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये क्रिकेट मॅच सुरू असलेल्या एका मैदानात थेट कार घुसली आणि त्यांच्या कारने मैदानात धडक दिली. त्यावेळी कारमध्ये दोन जण होते. हा अपघात झाल्याचे समजताच पोलीस तेथे पोहोचले आणि त्यानंतर पोलिसांसमोर जे सत्य आलं, त्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला.
ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, नॉर्थ अॅडलेडमधील रॉयल पार्कमधून २६ वर्षीय आणि २९ वर्षीय वयोगटातील दोन तरुण कार ड्राईव्ह करत इकडे तिकडे फिरत होते. दोन्ही तरूण धमाल मस्ती करत फिरत राहिले, आणि अचानक भरधाव वेगाने चालत असलेली कार त्या तरूणांनी थेट क्रिकेटच्या मैदानात घुसवली. कार थेट एका मैदानात घुसला, त्यावेळी तिथे क्रिकेट मॅच सुरू होती. अपघाताची पाहणी करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी प्रश्नोत्तर विचारल्यानंतर, ती कार आदल्या दिवशी चोरी करण्यात आलेले वाहन असल्याचे समोर आले. तसेच, चोरीच्या कारचा पोलिस पाठलाग करत असल्यामुळेच या तरूणांनी मैदानात कार घुसवली होती, हे देखील स्पष्ट झाले.
गाडी भरधाव वेगाने मैदानात घुसली आणि त्याच वेगाने पुढे येत होती. उपस्थित लोकांनी सांगितले की, अखेरच्या प्रसंगी चालकाने दिशा बदलली ही दिलासादायक बाब आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचा वेग एवढा होता की, दिशा बदलली नसती तर मोठा अपघात होऊन कोणाचा तरी जीव गेला असता. पण दिशा बदलल्याने गाडी आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी कार चोरीला गेली आणि दोघेही ती घेऊन निघून गेले. कार मालकाने त्यांच्याशी वाद घातला असता एका चोरट्याने त्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून घाबरवले. ही तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांनी पाठलाग केला आणि पाठलाग सुरू झाल्यावर ते तरूण कार घेऊन थेट क्रिकेटच्या मैदानात घुसले.