सेंट जोन्स : दिग्गज कॅरेबियन क्रिकेटपटू एव्हर्टन वीक्स यांचे ९५ व्या वर्षी बुधवारी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते दीर्घकाळ आजारी होते. बार्बाडोस येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर क्लाईड वॉल्काट, सर फ्रँक वॉरेल आणि एव्हर्टन वीक्स हे (थ्री डब्ल्यू) नावाने प्रसिद्ध होते. कॅरेबियन क्रीडा क्षेत्राचे जनक अशी त्यांची दुसरी ओळख होती. वीक्स यांनी १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. त्यांनी एकूण ४८ कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे त्यांनी ५८ च्या सरासरीने ४,४५५ धावा केल्या. दहा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी १५ शतके ठोकली. सलग पाच सामन्यात शतके ठोकण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. पदार्पणाच्या वर्षातच त्यांनी हा पराक्रम केला होता. भारतीय गोलंदाजीवर त्यांनी नेहमी मोठी फटकेबाजी केली. भारताविरुद्ध १० कसोटीत त्यांनी १४९५ धावा केल्या. २०७ ही सर्वोच्च खेळी त्यांनी भारताविरुद्ध पोर्ट आॅफ स्पेनमध्ये केली.
आयसीसीसह अनेक खेळाडूंची श्रद्धांजली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह अनेक आजी-माजी खेळाडूंनी कॅरेबियन क्रिकेटचे भीष्म पितामह सर एव्हर्टन वीक्स यांना श्रद्धांजली अर्पण केली. विंडीज क्रिकेटचे वर्चस्व वाढविण्यात सर एव्हर्टन यांचे महान योगदान असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
केवळ द्रविडने केली विक्रमाची बरोबरी
विश्व क्रिकेटमध्ये गेल्या ७० वर्षांत केवळ राहुल द्रविडने सलग चार डावात शतके ठोकून एव्हर्टन वीक्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली. द्रविडने २००२ च्या इंग्लंड दौऱ्यात सलग तीन शतके झळकवल्यानंतर भारत दौºयावर आलेल्या विंडीज संघाविरुद्ध १०० धावा करीत ही विक्रमी कामगिरी केली होती.
मास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, विव्हियन रिचर्डस्, व्हीव्हीएस लक्ष्मण, इंग्लंडचा माजी कर्णधार माइक आथरटन, विंडीजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप, भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री, विंडीजचा माजी कर्णधार डेरेन सॅमी यांनी एव्हर्टन यांना महान खेळाडू संबोधले. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड, मेरिलबोन क्रिकेट क्लब, बीसीसीआय, समालोचक हर्षा भोगले, माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, बिशनसिंग बेदी यांनी टिष्ट्वटरवरून श्रद्धांजली वाहिली.
Web Title: Caribbean cricketer Everton Weeks dies; He breathed his last at the age of 95
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.