Join us  

विश्वजेतेपदामुळे कॅरेबियन नागरिक एकत्र येतील - होल्डर

‘विश्वचषक स्पर्धेतील यशस्वी मोहीम, चार दशकांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासोबतच कॅरेबियन नागरिकांना एकत्र आणण्यासाठी मदत मिळेल,’ असे मत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 4:02 AM

Open in App

लंडन : ‘विश्वचषक स्पर्धेतील यशस्वी मोहीम, चार दशकांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासोबतच कॅरेबियन नागरिकांना एकत्र आणण्यासाठी मदत मिळेल,’ असे मत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केले.होल्डर म्हणाला,‘जर आम्ही जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरलो तर ते विशेष महत्त्वाचे ठरेल. आम्ही यापूर्वी जेतेपद पटकावलेले आहे आणि कॅरेबियन देशांमध्ये नेहमीच म्हटले जाते की, जर वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करीत असेल तर विंडीजचे नागरिक खूश होतात.’ विद्यमान विश्व टी२० चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गौरवपूर्ण इतिहास आहे. विंडीजने १९७५ व १९७९ मध्ये पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला, तर १९८३ मध्ये तिसऱ्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. गेल्या दोन दशकांमध्ये संघर्ष करीत असलेल्या वेस्ट इंडिज संघाने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांत चमकदार विजय नोंदवला. त्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावले आहे.होल्डर म्हणाला, ‘तुम्ही अलीकडेच इंग्लंडविरुद्धची मालिका बघितली असेल. कॅरेबियन देशांमध्ये आम्ही जेथे गेलो तेथे नागरिकांनी आमच्या प्रयत्नांची व विजयाची प्रशंसा केली. क्रिकेटच्या मैदानावरील यशामुळे वेस्ट इंडिजचे नागरिक आनंदी होतात. आम्हाला यश मिळवताना व पुन्हा एकदा वर्चस्व गाजवताना बघतिल्यानंतर विंडीजचे मनोधैर्य उंचावेल. आम्ही आमच्या देशांमधील नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कायम ठेवू, अशी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)