मेलबर्न : लॉस एंजेलिस-२०२८ ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) विचार करत आहे. मात्र, यासाठी आता ऑस्ट्रेलियाने चंगच बांधला आहे. जर आयओसीकडून क्रिकेटसाठी पूर्ण प्रयत्न झाले नाही, तर मेलबर्न-२०३२ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने योजना आखली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) आपल्या भविष्यातील योजनांमध्ये क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचा उल्लेख आहे. क्रिकेटचा समावेश २०२८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये झाला नाही, तर १९०० सालानंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी बनवण्यात आलेल्या संभाव्य आठ खेळांच्या यादीमध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. आयसीसी या महिन्याच्या अखेरीस आयोसीपुढे आपला प्रस्ताव सादर करतील.
यजमानांना असतो हक्क, पण... नियमानुसार ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविणाऱ्या शहराला स्पर्धेत नवा खेळ समाविष्ट करण्याचा अधिकार असतो. मात्र, यासाठी आयओसीची मंजुरी मिळणेही आवश्यक असते. याआधी केवळ १९०० साली ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळविण्यात आले होते. त्यावेळी केवळ ब्रिटन आणि फ्रान्स यांनीच यामध्ये सहभाग घेतला होता.