भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) एथिक्स ऑफिसर विनीत सरन यांनी बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट संबंधी नोटीस पाठवली आहे. सरन यांनी बिन्नी यांना त्यांच्यावरील आरोपांवर 20 डिसेंबरपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार संजीव गुप्ता यांनी आरोप केला आहे की बिन्नी यांचू सून मयती लँगर स्टार स्पोर्ट्ससाठी काम करते आणि भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत सामन्यांचे मीडिया राईट्स त्यांच्याकडे आहेत.
‘तुम्हाला याद्वारे सूचित केलं जातं की बीसीसीआयच्या नियम आणि नियम 39(2)(बी) अंतर्गत बीसीसीआयच्या एथिक्स ऑफिसरना नियम 38(1) (आय) आणि नियम 38 (2) च्या उल्लंघनाची तक्रार मिळाली आहे. त्यानुसार हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचे प्रकरण आहे. तुम्हाला यावर 20 डिसेंबर किंवा त्यापूर्वी या तक्रारीवर आपले लिखित उत्तर देण्याचे निर्देश दिले जात आहेत,’ अशी नोटीस त्यांना पाठवल्याचं पीटीआयनं म्हटलंय.
ऑक्टोबर महिन्यात बिन्नी यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार आपल्या हाती घेतला होता. ते बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष आहेत. ते भारतासाठी 27 कसोटी सामने आणि 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मयती लँगर ही स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आणि रॉजर बिन्नी यांची सून आहे. ती सध्या अँकरींग करत आहे.