CEAT cricket awards 2024 : बीसीसीआय सचिव जय शाह यांची भारतीय क्रिकेटमध्ये एन्ट्री झाल्यापासून ते सतत चर्चेत असतात. काही क्रांतिकारी निर्णय घेण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही समान मानधन देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मागील वर्षी भारतात वन डे विश्वचषकाची स्पर्धा खेळवली गेली. अपराजित राहिलेल्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात नमवून ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. पण, जून २०२४ मध्ये भारताने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली.
क्रिकेट विश्वातील कलावंत आणि मागील वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बुधवारी मुंबईत पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी बीसीसीआय सचिव जय शाह यांना प्रशासन अन् कारभार उत्कृष्टरित्या सांभाळल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. त्यांनी हा पुरस्कार भारताच्या महिला क्रिकेट संघाला समर्पित केला.
जय शाह यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला
जय शाह म्हणाले की, इथे रोहित शर्माला त्याच्या पुढील प्रवासाबद्दल विचारण्यात आले. पण, त्याने यावर स्पष्टपणे भाष्य करणे टाळले. मात्र त्याचे उत्तर मी देऊ इच्छितो. मी राजकोट येथे सांगितले होते की, रोहित शर्मा बार्बाडोसच्या धरतीवर तिरंगा रोवेल. तसेच ट्वेंटी-२० विश्वचषकात पाहायला मिळाले. जर आम्हाला १४० कोटी भारतीयांचा आशीर्वाद मिळाला तर आम्ही अशीच कामगिरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकात करू.
दरम्यान, CEAT क्रिकेट रेटिंगच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला फिल सॉल्ट, टीम साउदी यांचीही उपस्थिती होती. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड, रोहित शर्मापासून ते जय शाह यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. बीसीसीआय सचिव जय शाह यांना प्रशासन अन् कारभार उत्कृष्टरित्या सांभाळल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. माजी खेळाडू सुनिल गावस्कर, संजय बांगर, मॅथ्यू हेडन आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनीही उपस्थिती दर्शवली.
Web Title: CEAT cricket awards 2024 BCCI Secretary Jai Shah boosted the enthusiasm of Team India players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.