नवी दिल्ली - तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत बुधवारी भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केले. टी-20 क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर भारताने प्रथमच न्यूझीलंडविरुद्ध विजयाची नोंद केली. त्यामुळे हा विजय भारतासाठी खास आहे. पण भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये अनेकांना या विजयामुळे जास्त आनंद झाला आहे. भले भारताने सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असेल पण पाकिस्तानमध्ये या विजयाचा जास्त आनंद आहे.
पाकिस्तानमधले क्रिकेटप्रेमी नक्कीच भारताच्या विजयामुळे आनंदीत नसतील. पण टी-20 मध्ये पाकिस्तानचा संघ नंबर 1 बनावा यासाठी तिथले क्रिकेटप्रेमी भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. भारताने जसा न्यूझीलंडवर विजय मिळवला तसा पाकिस्तानमध्ये आंनदोत्सव सुरु झाला.
भारताच्या विजयानंतर पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर सेलिब्रेशन सुरु केले. टी-20 च्या क्रमवारीत पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचल्याबद्दल अनेकांनी टीम इंडियाचे आभार मानले तर काहींनी उपहासात्मक टिका केली. टी-20च्या क्रमवारीत पाकिस्तानचे अव्वल स्थान टिकून रहावे यासाठी पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाला मालिका विजय मिळवण्याची विनंती केली.
भारताने न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयानंतर टी-20 रँकिंगमध्ये पाकिस्तानचा संघ नंबर 1 बनला आहे. याआधी न्यूझीलंडचा संघ पहिल्या आणि पाकिस्तान दुस-या स्थानावर होता. टीम इंडिया सध्या पाचव्या स्थानावर आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने तिन्ही सामने जिंकले तर टीम इंडिया रँकिंगमध्ये दुस-या स्थानावर आणि पाकिस्तान पहिल्या स्थानावर कायम राहील. भारताचा पराभव झाला तर मात्र पुन्हा पाकिस्तान दुस-या स्थानावर जाईल.
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी केली. याआधी झालेल्या ६ टी-२० सामन्यांत न्यूझीलंडने ५ वेळा बाजी मारली असून एका सामन्याचा निर्णय लागला नव्हता. यासह विराट सेनेने अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला विजयी निरोपही दिला. येथील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने तुफान हल्ला करताना न्यूझीलंडपुढे विजयासाठी निर्धारित २० षटकांत २०३ धावांचे तगडे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० षटकांत केवळ ८ बाद १४९ एवढीच मजल मारता आली.