मुंबई- क्रिकेट विश्वातील धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने गुरूवारी सनरायजर्स हैदराबादविरूद्ध झालेल्या सामन्यात खणखणीत शतक झळकावत त्याची टीम किंग्ज इलेव्हन पंजाबला विजय मिळवून दिला. ख्रिस गेलने 63 बॉल्समध्ये 104 धावा करत आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. 11 सिक्स व एक फोअरचा त्याच्या 104 धावांमध्ये सहभाग आहे.
ख्रिस गेलने त्याचं हे शतक त्याची मुलगी ब्लशला समर्पित केलं आहे. गेलची मुलगी ब्लश हिचा आज दुसरा वाढदिवस आहे. आयपीएलमधील पहिलं शतक झळकवून ते शतक त्याने मुलीला वाढदिवसाची भेट म्हणून दिलं आहे. 'माझं शतक मुलीला समर्पित करतो. तिचा दुसरा वाढदिवस आहे, असं ख्रिस गेलने म्हटलं. किंग्ज इलेव्हन पंजाब या संघात आल्यावर योगा करणाऱ्या व मसाज करणाऱ्या व्यक्तीला चिकटून रहा, असा सल्ला मला सेहवागने दिला आहे. मी त्याचंच पालन करतो आहे, असं गेलने हसून म्हटलं.
दरम्यान, ख्रिस गेलने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिलं शतक झळकावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. गेलच्या शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 193 धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग सनरायझर्स हैदराबादला करता आला नाही आणि पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. आपल्या घरच्या मैदानात पंजाबचा हा हैदराबादविरुद्धचा पहिला विजय ठरला. त्याचबरोबर हैदराबादचा हा यंदाचा मोसमातील पहिला पराभव ठरला.
Web Title: The Century Against Hyderabad Is Dedicated to My Daughter: Gayle
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.