लंडन : कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणारा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक (१४७) व कर्णधार जो रुट (१२४) या दोघांच्या शतकी तडाख्याच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध दुसरा डाव ११२.३ षटकात ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. यासह त्यांनी भारताला विजयासाठी ४६४ धावांचे आव्हान दिले. यानंतर इंग्लंडने भारताची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ५८ अशी अवस्था केली.
ओव्हल मैदानावर इंग्लंडने चौथ्या दिवशी २ बाद ११४ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. कूक व रुट यांनी तिसऱ्या गड्यासाठी २५९ धावांची भागीदारी करुन भारतीय खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण केले. कूकने २८६ चेंडूमध्ये १४ चौकारांसह १४७ धावा फटकावल्या. रुटनेही त्याला चांगली साथ देताना १९० चेंडूंमध्ये १२ चौकार व एका षटकारासह १२५ धावांची खेळी केली.
युवा हनुमा विहारीनेच भारताला दिवसातील पहिले यश मिळवून देत रुटला बाद केले. यासह त्याने आपला पहिला कसोटी बळी मिळवला. यानंतर काहीवेळाने त्याने कूकलाही तंबूचा रस्ता दाखवला. कूक तंबूत परतत असताना भारतीय खेळाडूंनी त्याच्याशी हस्तांदोलन करत निरोप दिला, तसेच प्रेक्षकांनीही उभे राहून कूकला मानवंदना दिली. कूक बाद झाल्यानंतर इंग्लंडने आक्रमणाच्या नादात बळी गमावले आणि अखेर ४२३ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा आणि विहारी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
यानंतर ४६४ धावांचे अशक्यप्राय आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत वाईट झाली. तिसºया षटकात वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने शिखर धवन (१) आणि चेतेश्वर पुजारा (०) यांना बाद करुन भारताची २ बाद एक धाव अशी अवस्था केली. पुढच्याच षटकात स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहली (०) पायचीत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला. यानंतर दिवसअखेरपर्यंत लोकेश राहुल (४६*) व अजिंक्य रहाणे (१०*) यांनी भारताची पडझड रोखली. भारताला आणखी ४०६ धावांची आवश्यकता असून ७ फलंदाज शिल्लक आहेत.
>कूक ठरला पंचरत्न
कारकिदीर्तील पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावणारा अॅलिस्टर कुक क्रिकेटविश्वातील पाचवा फलंदाज ठरला असून इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला.
आॅस्ट्रेलियाच्या रेगी डफ यांची १९०२-०५ अशी तीन वर्ष कारकिर्द होती. पण डफ यांनी आपल्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावले. सर डॉन ब्रॅडमन यांच्या काळातील बिल पोन्सफोर्ड आणि आॅस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ग्रेग चॅपेल यांनीही अशीच कामगिरी केली होती.
त्याचप्रमाणे, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिननेही आपल्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावले होते. त्यानंतर १८ वर्षांत कूकआधी हा विक्रम कुणालाही करता आला नव्हता.
>संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : १२२ षटकात सर्वबाद ३३२ धावा.
भारत (पहिला डाव) : ९५ षटकांत सर्वबाद २९२ धावा.
इंग्लंड (दुसरा डाव) : १०५ षटकांत ६ बाद ३६४ धावा (अॅलिस्टर कूक १४७, जो
रुट १२५; विहारी २/२४, शमी २/९७, जडेजा २/१४७.)
भारत (दुसरा डाव) : १८ षटकांत ३ बाद ५८ धावा (राहुल ४०*, रहाणे १०*; अँडरसन २/२३, ब्रॉड १/१७.)
द्विशतकी भागीदारी करुन इंग्लंडला मजबूत स्थितीत आणणारे जो रुट आणि अॅलिस्टर कूक.
Web Title: Century of former India captain; India chasing 464 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.