- रोहित नाईक
मुंबई : अनुभवी रॉस टेलर (९५) आणि टॉम लॅथम (१०३*) यांनी केलेल्या निर्णाय द्विशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य भारतीय संघाचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. विशेष म्हणजे २००वा एकदिवसीय सामना खेळणाºया विराट कोहलीने शानदार शतक झळकावून कॅप्टन इनिंग खेळल्यानंतरही भारताला पराभवास सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद २८० धावा काढल्यानंतर न्यूझीलंडने आवश्यक धाव ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ४९ षटकात पार केल्या. यासह किवी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
वानखेडे स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, कोहलीचा अपवाद वगळता इतर फलंदाजी अपयशी ठरल्याने भारताची धावसंख्या मर्यादित राहिली. धावांचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात केली. परंतु, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे गुप्टिल (३२), मुन्रो (२८) व कर्णधार केन विलियम्सन (६) यांना झटपट बाद केल्याने न्यूझीलंडचा डाव बिनबाद ४८ वरुन ३ बाद ८० असा घसरला. यावेळी भारत पुनरागमन करेल अशी आशा होती.
परंतु, टेलर - लॅथम यांनी चौथ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा विजय साकारला. टेलरने १०० चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ९५ धावा केल्या, तर लॅथमने १०२ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०३ धावांचा विजयी तडाखा दिला. विजयासाठी केवळ एका धावेची आवश्यकता असताना टेलर बाद झाला. यानंतर हेन्री निकोल्सने चौकर मारत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्का मारला. विशेष म्हणजे पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाल्यानंतर दुसºया सराव सामन्यात टेलर - लॅथम यांनी वैयक्तिक शतक ठोकताना न्यूझीलंडला विजयी केले होते. त्याच खेळीची पुनरावृत्ती या दोघांनी वानखेडे स्टेडियमवर केली.
तत्पूर्वी, कोहलीने कारकिदीर्तील विक्रमी ३१वे शतक झळकावताना भारताला आव्हानात्मक मजल मारुन दिली. कोहलीने १२५ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांसह १२१ धावांची शानदार खेळी केली. चौथ्या षटकात बोल्टने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने प्रथम धवन (९) आणि त्यानंतर रोहितला (२०) बाद करुन भारताची ५.४ षटकात २ बाद २९ अशी अवस्था केली.
यानंतर, कोहली व केदार जाधव यांनी भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्याने सलामी जोडी परतल्यानंतर पुढील ५ षटकात भारताने केवळ ८ धावा काढल्या. त्यात वैयक्तिक २९ धावांवर खेळत असलेल्या कोहलीला कॉलिन डि ग्रँडेहोमच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले.
एकाबाजूने कोहली खंबीरपणे किल्ला लढवत असताना दुसºया टोकाकडून केदार जाधव (१२), दिनेश कार्तिक (३७), महेंद्रसिंग धोनी (२५) आणि हार्दिक पांड्या (१६) अपयशी ठरले. कोहली - कार्तिक यांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करुन भरताची पडझड रोखली. अखेरच्या काही षटकांत भुवनेश्वर कुमारने १५ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावा चोपल्यामुळे भारताला आव्हानात्मक मजल मारता आली. न्यूझीलंडसाठी बोल्ट (४/३५) आणि टिम साऊदी (३/७३) यांनी अचूक मारा केला.
...आणि खेळ थांबला
न्यूझीलंड संघ फलंदाजी करत असताना चौथ्या षटकात वानखेडे स्टेडियममधील एक विद्युत प्रकाशझोत बंद राहिल्याने काही मिनिटांसाठी खेळ थांबविण्यात आला. कॉलिन मुन्रो - मार्टिन गुप्टिल या जोडिने ३.४ षटकांचा खेळ झालेला असताना मैदानात कमी प्रकाश असल्याने खेळण्यात अडचण येत असल्याचे पंचांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे काही मिनिटांसाठी खेळ थांबविण्यात आला होता. मात्र, लगेच काहीवेळाने बंद असलेला प्रकाशझोत सुरु झाल्याने खेळ पुन्हा एकदा सुरु झाला.
‘बॉलबॉय’ने घेतला कोहलीचा झेल...
पहिल्या डावातील २५व्या षटकात विराट कोहलीने अॅडम मिल्नेच्या गोलंदाजीवर लाँग लेगला षटकार ठोकला. यावेळी, सीमारेषेवर असलेला बॉलबॉय आयुष झिमरे याने एका हाताने अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर या षटकारापेक्षा आयुषने घेतलेल्या झेलचे क्षणचित्रे मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात येत होते आणि उपस्थित क्रिकेटप्रेमींनीही आयुषने घेतेलेल्या झेलचे कौतुक केले. आयुष हा मुंबई १६ वर्षांखालील संघातून खेळत असून त्याने हॅरीश व गाईल्श ढाल आंतरशालेय क्रिकेटमध्ये व्ही. एन. सुळे संघाकडून चमक दाखवली आहे. क्लब क्रिकेटमध्ये तो ओल्ड पोदाराईट्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.
धावफलक :
रोहित शर्मा त्रि. गो. बोल्ट २०, शिखर धवन झे. लॅथम गो. बोल्ट ९, विराट कोहली झे. बोल्ट गो. साऊदी १२१, केदार जाधव झे. व गो. सँटनर १२, दिनेश कार्तिक झे. मुन्रो गो. साऊदी ३७, महेंद्रसिंग धोनी झे. गुप्टील गो. बोल्ट २५, हार्दिक पांड्या झे. विलियम्सन गो. बोल्ट १६, भुवनेश्वर कुमार झे. निकोल्स गो. साऊदी २६, कुलदीप यादव नाबाद ०. अवांतर - १४. एकूण : ५० षटकात ८ बाद २८० धावा.
गोलंदाजी : टिम साऊदी १०-०-७३-३, ट्रेंट बोल्ट १०-१-३५-४; अॅडम मिल्ने ९-०-६२-०; मिशेल सँटनर १०-०-४१-१; कॉलिन डि ग्रँडेहोम ४-०-२७-०; कॉलिन मुन्रो ७-०-३८-०.
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. कार्तिक गो. हार्दिक ३२, कॉलिन मुन्रो झे. कार्तिक गो. बुमराह २८, केन विलियम्सन झे. जाधव गो. कुलदीप ६, रॉस टेलर झे. चहल गो. भुवनेश्वर ९५, टॉम लॅथम नाबाद १०३, हेन्री निकोल्स नाबाद ४. अवांतर - १६. एकूण : ४९ षटकात ४ बाद २८४ धावा.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-५६-१; जसप्रीत बुमराह ९-०-५६-१; कुलदीप यादव १०-०-६४-१; हार्दिक पांड्या १०-०-४६-१; युझवेंद्र चहल १०-०-५१-०.
Web Title: Century partnership of Latham and Ross Taylor, two-wicket partnership, India lost in the first ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.