सौरव गांगुली लिहितात...
न्यूझीलंड विरुद्धची मालिका गेल्या दीड वर्षांतील सर्वांत चांगली मालिका ठरली. या मालिकेत भारताने बाजी मारली तरी न्यूझीलंडने जो खेळ केला त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. अलीकडे ज्या संघांनी भारत दौरा केला त्यात न्यूझीलंड संघ चांगला प्रतिस्पर्धी वाटला. जेव्हा तुम्ही भारत दौ-यावर येता तेव्हा फिरकीला यशस्वी तोंड देणे आणि फिरकी गोलंदाजी यशस्वीपणे करणे या दोन्ही बाबींत तुम्ही निपुण असायला हवे, असे मी नेहमी सांगत आलो आहे. न्यूझीलंडने दोन्ही आघाड्यांवर यशस्वी कामगिरी केली.
टॉम लॅथम,कोलिन मुन्रो,रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी आणि मिशेल सेन्टनर यांची कामगिरी वाखाणण्यासारखी होती. मधल्या फळीने फिरकीला यशस्वी तोंड दिल्याने व्यवस्थापन समाधानी असेल. पण विलियम्सनऐवजी मी असतो तर मालिका विजय मिळवू न शकल्याचे शल्य बोचले असते. आठ षटकांत ६८ धावा करणे न्यूझीलंडसाठी कठीण नव्हते. भारताला हे आव्हान असते तर निश्चितपणे ते गाठले असते.
कानपूर आणि त्रिवेंद्रम येथील वातावरण पाहुण्यांना पूरक असताना भारताने विजय नोंदविला. दडपणात विजय मिळविल्याने माझ्या दृष्टीने दोन्ही विजय मोलाचे ठरले. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांचा फॉर्म अप्रतिम होता. संघाने यजुवेंद्र चहल याला वारंवार संधी देण्याची गरज आहे. विदेशात तो निर्णायक ठरू शकतो. मधल्या फळीत प्रयोग करण्याचे विराटचे तंत्र आवडले. तुम्ही आता हे प्रयोग करणार नसाल तर नंतरही करू शकणार नाही. ज्या खेळाडूंचे प्रयोग झाले त्यापैकी लोकेश राहुल उत्तम वाटला. विराटने त्यालाही वारंवार संधी द्यायला हवी.
कुठल्याही मैदानावर सरस ठरू शकेल इतकी क्षमता लोकेश राहुलमध्ये नक्कीच आहे. तो भारतीय फलंदाजी क्रमवारीत महत्त्वाचा ठरु शकतो. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाजीत भारताने पर्याय शोधायला हवेत. त्यादृष्टीने उमेश यादव, मोहम्मद शमी या अनुभवी गोलंदाजांसह शार्दुल ठाकूर याचाही लंकेविरुद्ध शिताफीने वापर करण्याची भारताकडे चांगली संधी आहे.
Web Title: Chahal, Lokesh Rahul should get a chance!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.