नवी दिल्ली : आतापर्यंत खेळाडू करोडपती झाल्याचे साऱ्यांनी ऐकले आणि पाहिले असेल, पण त्यांची जे निवड करतात त्यांना मात्र आतापर्यंत खेळाडूंसारखे मानधन मिळत नव्हते. पण बीसीसीआयने मात्र आता आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे. त्यानुसार भारतीय क्रिकेट निवड समिती अध्यक्ष आता करोडपती होणार आहे.
बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन कमिटीची एक बैठक पार पडली. भारताचा माजी यष्टीरक्षक साबा करीम या कमिटीचा अध्यक्ष होता. या कमिटीच्या बैठकीमध्ये निवड समिती, पंच, स्कोरर यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतण्यात आला. पण बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांना मात्र या निर्णयाबाबत सुचित करण्यात आले नाही.
यापूर्वी निवड समिती अध्यक्षांना 80 लाख रुपये एवढे मानधन दिले जात होते, त्याचबरोबर निवड समिती सदस्यांना प्रतिवर्षी 60 लाख एवढे मानधन मिळत होते. आता नवीन निर्णयानुसार निवड समिती अध्यक्षांना प्रत्येक वर्षी एक कोटी आणि निवड समिती सदस्यांना 75 ते 80 लाख एवढे मानधन मिळणार आहे.
बीसीसीआयने पंच, सामनाधिकारी, स्कोरर यांच्या मानधनात दुपचीने वाढ केली आहे. प्रथम श्रेणी, तीन दिवसीय किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये पंचगिरी करण्यासाठी यापूर्वी 20 हजार एवढे मानधन दिले जायचे. पण नवीन निर्णयानुसार हे मानधन 40 हजार रुपये एवढे असेल. त्याचबरोबर ट्वेन्टी-20 सामन्यांसाठी यापूर्वी पंचांना 10 हजार एवढे मानधन मिळायचे, आता त्यांना 20 हजार रुपये मिळणार आहेत.