आशिया चषक २०२३ च्या फायनलच्या आदल्या दिवशी म्हणजे आज निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कोलंबोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनासोबत अनौपचारिक बैठक घेतली. टीम हॉटेलमध्ये तीन तास मॅरेथॉन बैठक चालली. फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाब्रे हे दोघेही उपस्थित होते. या बैठकीत अंतिम सामन्याव्यतिरिक्त आगरकरने ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघाबाबतही चर्चा केली.
आशिया कप फायनलनंतर लगेचच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन डे सामन्यांची मालिका घरच्या मैदानावर खेळणार आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतासाठी ही अंतिम संधी असेल. श्रेयस अय्यरसाठी INDvs AUS ही मालिकाही महत्त्वाची असेल. आशिया चषक स्पर्धेत अय्यरचा संघात समावेश झाला, परंतु एक सामना खेळून तो बाहेरच आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढल्याने तो नंतर खेळलेला नाही. तो पूर्णपणे फिट आहे की, नाही हेही अद्याप समजलेलं नाही. बीसीसीआयच्या सूत्रानुसात तो रिकव्हर होतोय, परंतु १०० टक्के तंदुरुस्त नाही. त्यामुळे आशिया चषकाच्या फायनलमध्येही त्याचे खेळणे अशक्य आहे.
श्रेयस अय्यरसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ३ वन डे सामन्यांची मालिका शेवटची संधी असेल. त्याने या मालिकेत चांगली कामगिरी केली तर त्याला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळू शकेल. अन्यथा, भारत त्याऐवजी वर्ल्ड कप स्पर्धेत इशान किशनवर अवलंबून राहू शकेल. मोहम्मद शमीसाठीही हे सामने महत्त्वाचे असतील. आशिया कपमध्ये तो आतापर्यंत ठिकठाक कामगिरी करताना दिसत आहे. त्याने १५ षटकांत ३ विकेट्स घेतल्या आहेत. ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप सुरू होत असल्याने, शमीला शार्दूल ठाकूरच्या पुढे संधी मिळवायची असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. अर्थात त्याला संधी किती मिळते हेही महत्त्वाचे आहे.
IND vs AUS मालिका २२ सप्टेंबरला मोहाली येतून सुरू होतेय. त्यानंतर २४ सप्टेंबरला दुसरी वन डे इंदूर आणि २७ सप्टेंबरला तिसरी वन डे राजकोट येथे होईल. ही मालिका संपल्यानंतर, भारतीय संघ ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून प्रारंभ करेल. त्याआधी भारताचे नेदरलँड्स आणि इंग्लंडविरुद्ध सराव सामने आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला अहमदाबादमध्ये १४ ऑक्टोबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा संभाव्य संघ ( Probable squad for IND vs AUS series) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, सुर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.