चेन्नई : गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सपुढे मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या लढतीत धोकादायक फलंदाज आंद्रे रसेलला रोखण्याचे आव्हान असेल. दर्जेदार फिरकीपटूंचा समावेश असलेल्या उभय संघांदरम्यानच्या लढतीत रसेल निर्णायक भूमिका बजावू शकतो. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकलेले असून शानदार फॉर्मात आहे. त्याचवेळी, दोन्ही संघ विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्यासाठी उत्सुक आहेत.महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सहज विजय मिळवला, पण दिनेश कार्तिकच्या संघाविरुद्ध त्यांचा मार्ग सोपा राहणार नाही. केकेआरने रविवारी रात्री राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय नोंदवला.
दोन्ही संघात दर्जेदार फिरकीपटू आहेत. त्यामुळे फलंदाजांना आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. चेन्नई संघात हरभजन सिंग, इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा असून त्यांनी पंजाबविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. केकेआर संघात कुलदीप यादव, सुनील नरेन आणि पीयूष चावला आहेत. त्यांनी जयपूरमध्ये जोस बटलरला नैसर्गिक फलंदाजी करण्याची संधी दिली नाही. आता एम. चिदंबरम स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर कुठल्या संघाचे फिरकीपटू छाप सोडतात, याबाबत उत्सुकता आहे.
फलंदाज फिरकीपटूंना कसे सामोरे जातात, यावर सर्वांची नजर राहील. सुपर किंग्सपुढे शानदार फॉर्मात असलेल्या रसेलला रोखण्याचे मुख्य आव्हान आहे. रसेलही पुन्हा एकदा आपल हिसका दाखवून चेन्नईला त्यांच्याच गृहमैदानावर पराभूत करण्यासाठी उत्सुक असेल.दुसऱ्या बाजूचा विचार करता चेन्नईने दुखापतग्रस्त ड्वेन ब्राव्होच्या स्थानी गेल्या लढती फाफ ड्यूप्लेसिसला संधी दिली. त्याने ३८ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या षटकांमध्ये आपली भूमिका चोख बजावली. (वृत्तसंस्था)