हॅमिल्टन : एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा ज्या खेळपट्टीवर अवघ्या ९२ धावांत खुर्दा उडाला होता, त्याच हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर रविवारी भारतीय संघाला अखेरच्या टी२० सामन्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध भिडायचे आहे. याआधी याच ठिकाणी झालेल्या सामन्याची कामगिरी लक्षात घेता न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा टी२० सामना जिंकून मालिका काबिज करणे भारतीयांसाठी नक्कीच आव्हानात्मक ठरेल. यंदाच्या सत्रात यशाचे नवे शिखर पादाक्रांत करणारा भारतीय संघ अखेरच्या टी२० सामन्यात विजय मिळवून विदेशात आणखी एक विक्रम नोंदविण्याच्या निर्धाराने खेळेल.
मागचे तीन महिने टीम इंडियाच्या दृष्टीने शानदार ठरले. भारताने आॅस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत नमविले. त्यानंतर आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानावरील एकदिवसीय मालिकेतही धूळ चारली. त्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच टी२० मालिका विजयाची संधीही चालून आली आहे. त्यामुळे रविवारचा दिवस चाहत्यांसाठी ‘सुपर संडे’ ठरेल. त्याचवेळी, हॅमिल्टनच्या खेळपट्टीपासून मात्र सावध रहावे लागेल. याच मैदानावर चौथ्या एकदिवसीय सामन्यात ट्रेंट बोल्टच्या स्विंग माऱ्यापुढे भारतीय संघ ९२ धावात गारद झाला होता.
तिसºया सामन्यात संघात कोणतेही बदल न करण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. जर, बदल झालाच, तर युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. गेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारतीय गोलंदाज आपला फॉर्म कायम राखण्यावर भर देतील. दुसºया टी२० सामन्यात टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी यजमानांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले होते. कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार व खलील अहमद यांच्यावर भारतीय गोलंदाजीची मदार असेल. फलंदाजीत रोहित आधारस्तंभ असून
मध्यल्या फळीत अनुभवी महेंद्रसिंग धोनीची कामगिरी निर्णायक ठरेल. तसेच युवा ॠषभ पंतकडून पुन्हा एकदा शानदार खेळीची अपेक्षा असेल.
न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सनचे अपयश चिंतेची बाब आहे. त्याला अद्याप आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात यश आलेले नाही. याशिवाय अनुभवी रॉस टेलरलाही आपल्या खेळीमध्ये सातत्य ठेवण्यात यश आले नाही.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमान गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रासवेल, कॉलीन डे ग्रँडहोम, लोकी फर्ग्युसन, स्कॉट के, कोलिन मुन्रो, डेरिल मिशेल, मिशेल सँटेनर, टीम सेइफर्ट, ईश सोढी, टीम साउदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स नीशाम.
Web Title: Challenge against India on the disastrous pitch victory in the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.