सिडनी : ॲशेस मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आज बुधवारपासून येथे सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत स्कॉट बोलॅन्डला संघात कायम ठेवले तर प्रतिष्ठा राखण्यासाठी धडपडणाऱ्या इंग्लंडने अखेर अनुभवी ख्रिस ब्रॉड याला संधी देण्याचे ठरविले आहे.
मेलबोर्न सामन्यात बोलॅन्डने कसोटी पदार्पणात ७ धावात ६ फलंदाज बाद करीत इंग्लंडला दुसऱ्या डावात ६८ धावात गुंडाळले होते. अनुभवी गोलंदाज जो हेजलवूड खेळणार नसल्याने बोलॅन्ड संघात असेल हे निश्चित. संघात एकमेव बदल असेल तो मधल्या फळीतील फलंदाज ट्रॅविस हेड याच्या रूपाने. तो पॉझिटिव्ह आल्याने संघाबाहेर झाला. त्याचे स्थान उस्मान ख्वाजा घेईल, ख्वाजाने २०१९ नंतर पुनरागमन केले.
इंग्लंड संघातील मुख्य कोच ख्रिस सिल्व्हरवुड, व सहयोगी स्टाफमधील काहीजण मेलबोर्नमध्ये क्वारंटाईन आहेत. सिल्व्हरवुड यांची जबाबदारी सांभाळणारे सहायक कोच ग्रॅहम थोर्प यांनी ३५ वर्षांचा वेगवान गोलंदाज ब्रॉडला संघात स्थान दिले. इंग्लंड संघात झालेला हा एकमेव बदल आहे. ब्रॉडने या मालिकेत केवळ एक सामना खेळला. यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंंनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. ब्रॉडला ओली रॉबिन्सन याच्याऐवजी स्थान मिळाले.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची भिस्त कमिन्स, मिशेल स्टार्क, बोलॅन्ड आणि फिरकी गोलंदाज नाथन लियोन यांच्यावर असेल. कमिन्सने खेळपट्टी पाहिल्यानंतर दुसरा फिरकी गोलंदाज न खेळविण्याचा निर्णय घेतला. हेजलवुड आणि झाय रिचर्डसन यांनी नेटमध्ये गोलंदाजी केली मात्र दोघेही फिट नाहीत.
उभय संघ असे : ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वाॅर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, उस्मान ख्वाजा, कॅमरन ग्रीन, ॲलेक्स केरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लियोन, स्कॉट बोलॅन्ड. इंग्लंड : हसीब हमीद, ज़ाक क्रॉली, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मार्क वुड, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स ॲन्डरसन.
Web Title: The challenge facing England to maintain its reputation; Fourth Ashes Test from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.