मुंबई : पहिला सामना गमावल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाला शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या वनडे दरम्यान विजयासह मालिका वाचविण्याचे अवघड आव्हान असेल. वानखेडेवरील पहिल्या सामन्यात भारतीय संघ प्रत्येक आघाडीवर माघारला होता.
जेमिमा रॉड्रिग्ज ८२ आणि पूजा वस्त्राकर नाबाद ६२ यांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ बाद २८२ अशा सर्वोच्च धावा उभारल्या. नंतर सात गोलंदाज निष्प्रभ ठरल्याने पाहुण्या संघाने तीन षटके आधीच सहा फलंदाज शिल्लक राखून सहज विजयाची नोंद केली होती. आपल्या मैदानावर भारताचा हा सलग आठवा पराभव होता. मागच्या २३ दिवसांत सर्व प्रकारात भारतीय संघाचा हा सातवा सामना आहे. ३५ दिवसांत ११ सामने खेळायचे आहेत. तब्येतीच्या कारणास्तव पहिल्या सामन्यास मुकलेली उपकर्णधार स्मृती मानधना खेळेल का हे पाहावे लागेल. भारताला विजय मिळवायचा झाल्यास तहलिया मॅक्ग्रा हिला लवकर बाद करावे लागेल. पहिल्या सामन्यात खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती. पुढील दोन सामन्यात त्यात बदल होईल, ही शक्यता कमीच आहे.